पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) आज म्हणजेच २८ जुलै रोजी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे. काल (गुरुवार, २७ जुलै) रात्री पावणे नऊच्या सुमारास दरड कोसळली होती. या पार्श्वभूमीवर हा ब्लॉक घेण्यात आला आहे.
दुपारी २ ते ४ दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे. जुन्या पुणे मुंबई महमार्गाने ही वाहतूक मार्गस्थ होईल आणि लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी जोडली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू राहील. सोमवार (२४ जुलै) आणि गुरुवारी (२७ जुलै) देखील असेच विशेष ब्लॉक घेण्यात आले होते. त्यावेळी आडोशी बोगद्याजवळची दरड हटविण्यात आली होती.
(हेही वाचा – Manipur Violence : आता सीबीआय करणार मणिपूर महिला अत्याचाराचा तपास)
पुन्हा दरड कोसळली
काल रात्री पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही दरड कोसळली. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू होती. त्यानंतर काहीवेळात मातीचा हा ढिगारा बाजूला केल्यावर उर्वरित दोन लेनही सुरू करण्यात आल्या. मुंबई – पुणे महामार्गावर रविवारी (२३ जुलै) रात्री साडे दहा वाजता दरडीची पहिली घटना घडली, ती मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ तर दुसरी दरड त्याच मध्यरात्री तीन वाजता लोणावळ्याजवळ कोसळली होती. चार दिवसानंतर दरडीची ही तिसरी घटना आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूकही सुरळीत करण्यात आली. मात्र आता या रस्त्यावरील काही भागातील दरड हटवण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community