कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत कृषी अभ्यासक्रम प्रवेशातील अडचणी दूर करण्याचा निर्णय

189
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल होणार

राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये आता बदल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. यानिर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे तसेच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होणार आहे.

(हेही वाचा – Pune-Mumbai Expressway : महामार्गावर दरड कोसळल्यामुळे दोन तासांचा ब्लॉक)

राज्यातील कृषी महाविद्यालये व कृषी अभ्यासक्रम प्रवेशासंदर्भातील अडचणी दूर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८ जुलै) मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार शेखर निकम, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठांचे कुलगुरु (व्हीसीद्वारे) आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रिया नियमांमध्ये बदल करताना ते विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक सोयीचे असतील तसेच राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळेल, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीने राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास परवानगी देण्यासंदर्भातही या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटीका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.