परदेशात पद्व्युत्तर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट देणारी वेबसाईट बंद असल्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने या संदर्भात आवाज उठवताच प्रशासन खडबडून जागे झाले असून, संबंधित वेबसाईट तात्काळ सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील एमजीएम सीईटी (MGM CET) महाविद्यालयातून राजस जोगळेकर हे पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी या क्षेत्रात पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी यूके (UK) येथे प्रवेश घेतला आहे. यूके (UK) येथील महाविद्यालयाने राजस यांच्याकडे बोनाफाइड सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेटची मागणी केल्यामुळे त्यांनी महाविद्यालयांत धाव घेतली, मात्र महाविद्यालयाने मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईनच मिळते, असे सांगितले. राजस यासाठी राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात गेले. मात्र तिथेही त्यांना ऑनलाईनच अर्ज करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार राजस जोगळेकर हे मागील आठवडाभरापासून http://aaplesarkar.com या वेबसाईटवर अर्ज करत होते. मात्र, सर्व माहिती भरल्यानंतरही वेबसाईट पुढे काम करत नव्हती. त्यामुळे साईटवर दिलेल्या हेल्पलाइन (helpline) नंबरवर संपर्क त्यांनी केला. मात्र, तो नंबरही बंद होता. राजस यांनी संबंधीत विभागाला मेल केला, मात्र त्यावरूनही अपेक्षित उत्तर मिळाले नाही.
विशेष म्हणजे ज्या यूके (UK) येथील महाविद्यालयात राजस यांनी प्रवेश घेणे ठरवले आहे, त्याची अंतिम मुदत ३० जुलै आहे. आता त्यांच्याकडे अवघे २ दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत राजस यांचा मायग्रेशन सर्टिफिकेटसाठीचा संघर्ष सुरूच आहे. असे हजारो विद्यार्थी आहेत, जे मायग्रेशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी धडपड करत आहेत, परंतु सरकारच्या अनास्थेमुळे त्यांच्या पदरी निराशा येत आहे. याविषयी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने २७ जुलै २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता वृत्त प्रकाशित केले आणि ही बाब उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि अवघ्या काही तासांत ही वेबसाईट सुरू झाली. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा – Nigerian Gang : मुंबई, नवी मुंबईतून कोट्यवधींच्या ड्रग्जसह नायजेरियन टोळ्यांना अटक)
‘हिंदुस्थान पोस्ट’चे आभार
मायग्रेशन सर्टिफिकेट देणारी वेबसाईट बंद असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणारे हजारो विद्यार्थी चिंतेत असल्याचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने २७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता प्रसिद्ध केले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ८ च्या सुमारास वेबसाईट सुरू झाली. आता मी स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. दोन दिवसांत काम होईल, अशी अपेक्षा आहे. आम्हाला न्याय देण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे आभार
– राजस जोगळेकर, विद्यार्थी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community