महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची उपचारमर्यादा दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा करून चार महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरी अद्याप शासन निर्णय (जीआर) जाहीर झाला नसल्यामुळे पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यास संलग्न रुग्णालयांकडून नकार दिला जात असल्याची बाब ‘हिंदुस्थान पोस्ट’ने २३ जुलैच्या अंकातून उघडकीस आणली होती. त्याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या उपचारमर्यादा वाढीचा ‘जीआर’ जारी केला आहे.
२८ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या ‘जीआर’ नुसार, विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेत काही बदल व योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत योजनेत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख इतके आरोग्य संरक्षण दिले जाते. तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५ लाख इतके आहे. त्यात बदल करून प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख इतके करण्यात येत आहे.
मुत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण रु. २.५ लाख इतकी आहे, ती आता रु. ४.५० लाख करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात येत आहेत. तर ३२८ मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संख्येत १४७ ने वाढ होऊन उपचार संख्या १३५६ एवढी करण्यात येत आहे व १३५६ एवढेच उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचार संख्या ३६० ने वाढविण्यात येत आहे. सदर १३५६ उपचारांपैकी ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील, असे ‘जीआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Opposition Alliance Meeting : ‘या’ दिवशी मुंबईमध्ये होणार विरोधी आघाडीची तिसरी बैठक)
रुग्णालयांची संख्या वाढवली
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या १ हजार इतकी आहे. ही योजना याआधीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करुन सीमा लगतच्या महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात १४० व सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील ४ जिल्ह्यात १० अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे.
- त्या व्यतिरिक्त २०० रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता अंगीकृत रुग्णालयांची संख्या १३५० होईल. याशिवाय सर्व शासकीय रुग्णालये या योजेमध्ये अंगीकृत करण्यात येतील. उपरोक्त रुग्णालयांव्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालये, अशा रुग्णालयांची इच्छा असल्यास या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.
- शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.
- ही योजना संपूर्णपणे हमी तत्वावर राबविण्यात येईल म्हणजे उपचाराचा जो खर्च होईल तो राज्य आरोग्य हमी सोसायटी थेट अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करेल. संपूर्णपणे हमी तत्वावर राबवण्याची यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत सध्याच्या पद्धतीनुसार (विमा आणि हमी तत्वावर) मात्र वरील १ ते ७ येथील सुधारित तरतूदींनुसार योजना राबविण्यात येईल. शासकीय रुग्णालयांना या योजनेतून मिळणारा पैसा संबंधित रुग्णालयांकडेच ठेवण्यास परवानगी देण्यात येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community