गोरेगाव मुलुंड जोड रस्ता : भूमिगत दोन समांतर बोगदा प्रकल्पासाठी जेकुमार-एनसीसी कंपनीची निवड

बोगदा प्रकल्पासाठी ६ हजार ३०१ कोटी रुपये होणार खर्च

288
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता : भूमिगत दोन समांतर बोगदा प्रकल्पासाठी जेकुमार-एनसीसी कंपनीची निवड
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता : भूमिगत दोन समांतर बोगदा प्रकल्पासाठी जेकुमार-एनसीसी कंपनीची निवड

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पांतर्गत गोरेगावमधील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत दोन समांतर भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी बोली लावणाऱ्या जेकुमार-एनसीसी या संयुक्त भागीदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ६ हजार ३०१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या तीन टप्प्याचे काम पूर्णत्वास आले असून चित्रनगरीतून जाणाऱ्या या बोगदा प्रकल्पाचे काम प्राण्यांच्या नैसर्गिक वावराला कुठेही बाधा न आणता सुरक्षितपणे केले जाणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य होणार आहे, शिवाय मोठ्या प्रमाणात इंधन बचत होणार आहे.

यासंदर्भात बोलतांना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल असे म्हणाले की, सद्यस्थितीला पूर्व द्रुतगती महामार्गापासून ते खिंडीपाडा जंक्शन (अमर नगर, मुलुंड) आणि पश्चिम द्रुतगती मार्गापासून चित्रनगरी (गोरेगाव) दरम्यानच्या या प्रकल्पांतर्गत रस्त्यांची विविध कामे प्रगतिपथावर आहेत. चित्रनगरी (फिल्म सिटी) ते खिंडीपाडा जंक्शन या टप्प्या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचा भाग असल्याने, हा टप्पा (मिसिंग लिंक) जोडण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने सविस्तर अभ्यास करण्यात आला होता. त्याच्या निष्कर्षानुसार हा टप्पा समांतर अशा जुळ्या आणि पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या अर्थात भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून जोडण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्येकी तीन मार्गिका असणाऱ्या या जुळ्या बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. कारण हा बोगदा बांधणे हे आव्हानात्मक स्वरुपाचे काम आहे. ही बाब लक्षात घेता, या बोगद्याच्या बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा जाहिरात प्रसिद्ध करुन जागतिक स्तरावरच्या कंपन्या स्पर्धेमध्ये सहभागी होवू शकतील, अशा रितीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जागतिक निविदा प्रकाशित करण्यात आली. ही निविदा प्रक्रिया आता फलद्रूप झाल्याने निश्चितच गोरेगांव-मुलुंड जोडरस्त्याच्या निर्मितीला वेग येणार आहे, असल्याचे चहल यांनी नमूद केले.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी असे म्हणाले की, गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता अंतर्गत जुळा बोगदा बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात जेकुमार-एनसीसी जेव्ही, एल ऍण्ड टी आणि ऍफकॉन्स अशा तीन कंपन्यांनी निविदा स्पर्धेत भाग घेतला होता. यातील जेकुमार-एनसीसी या संयुक्त भागीदार कंपनीने सर्वांत कमी बोली लावली आहे. ही बोली ६ हजार ३०१ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे या बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येईल, असा विश्वास वेलरासू यांनी व्यक्त केला. एकमेकांना समांतर असे दोन समांतर बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटरचे असतील. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात त्याचा अंतर्गत व्यास १३ मीटरचा असेल. हा बोगदा अभयारण्याच्या डोंगराच्या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा बोगदा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. कारण संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील वन्यजीवन, जलाशय, वृक्षसंपदा यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही. कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही. या बोगद्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी यंत्रणा, आग प्रतिबंधात्मक अद्ययावत यंत्रणा, तसेच पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या आणि इतर संस्थांच्या वाहिन्याही विकसित करण्यात येतील. हा संपूर्ण बोगदा टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) च्या माध्यमातून खणला जाईल. या प्रकल्पासाठी पर्यावरणीय आणि वन विभागाच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे बोगद्याची निविदा फलद्रूप होणे, हे प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण बोगदा साकारण्याचा कालावधी एकूण ६० महिन्यांचा म्हणजेच ५ वर्षांचा अपेक्षित असून बोगद्याच्या कामाला ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात केली जाईल, असा अंदाज वेलरासू यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – iPhone 14 : आयफोनसाठी दाम्पत्याने विकले 8 महिन्याचे बाळ)

बोगदा प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये –

  • प्रस्‍तावित बोगद्यांची लांबी : प्रत्‍येकी ४.७ किलोमीटर
  • व्‍यासाचा आकार : १३ मीटर अंतर्गत
  • कमाल वेग : ८० किलोमीटर प्रति तास
  • मार्गिका : तीन मार्गिका आणि पदपथ तसेच विविध यंत्रणांच्या वाहिन्या
  • संपूर्ण गोरेगांव-मुलुंड जोड रस्त्याची एकूण लांबी : अंदाजे १२.२० किलोमीटर
  • गोरेगांव-मुलुंड जोड रस्त्याची प्रस्तावित रुंदी : ४५.७० मीटर
  • बोगद्यांची जमिनीखाली खोली : २० ते २२० मीटर.
  • समांतर बोगद्यांतील मार्गिका : प्रत्येकी तीन
  • समांतर बोगद्यांचा व्यास : १४.२० मीटर
  • दोन्ही बोगद्यांमधील अंतर : १५ मीटर
  • दोन्ही बोगद्यांमधील छेद मार्ग : प्रत्येक ३०० मीटर
  • प्रगत अग्निशमन यंत्रणा आणि अग्निरोधक यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणा
  • चित्रनगरी प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्राणी मार्गही साकारण्यात येईल
  • संजय गाधी राष्ट्रीय उद्यानात कोणतेही भूसंपादन नाही

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.