मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा मेट्रो), नागपूर या पदावर झाल्यानंतर त्यांच्याकडील कारभार हा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे नवीन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त आयुक्त (शहर) विभागाचा पदभार हा पी. वेलरासू यांच्याकडे राहणार आहे.
अतिरीक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली आता शासनाने व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा मेट्रो), नागपूर या पदावर केली आहे. त्यामुळे या पदाचा कार्यभार मुंबई महापालिका आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार डॉ. नितीन करीर यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा असे त्यांच्या नियुक्तीच्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार हर्डीकर यांनी दुपारी साडेतीन वाजता आपल्याकडील अतिरिक्त आयुक्त(शहर) तसेच विधी, परवाना विभाग आदी पदांचा अतिरिक्त कारभार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्याकडे सोपवला.
(हेही वाचा – गोरेगाव मुलुंड जोड रस्ता : भूमिगत दोन समांतर बोगदा प्रकल्पासाठी जेकुमार-एनसीसी कंपनीची निवड)
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे मुख्यालयात उपस्थित नसल्याने त्यांचा संदेश आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त चंद्रशेखर चौरे यांनी हर्डीकर यांच्याकडे पोहोचवल्यानंतर हर्डीकर यांनी आपल्याकडील पदाचा भार पी. वेलरासू यांच्याकडे सोपवला. हर्डीकर यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लगेचच ते मसुरीला २८ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. या प्रशिक्षणाच्या कालावधीत अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार सहआयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे हर्डीकर यांच्याकडील पदभार सहआयुक्त रमेश पवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु प्रत्यक्षात पवार यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार न सोपवता सनदी अधिकारी असलेल्या पी.वेलरासू यांच्याकडेच हा भार सोपवला गेला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community