सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबईत पोलिसांचे १३ नवीन सायबर सेल युनिट

195
सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मुंबईत पोलिसांचे १३ नवीन सायबर सेल युनिट
सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मुंबईत पोलिसांचे १३ नवीन सायबर सेल युनिट

मुंबई – संतोष वाघ 

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस दलात १३ नवीन सायबर सेल युनिटची स्थापना करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर, हार्डवेअर तसेच इतर साधन सामुग्रीसह नवीन सायबर सेल युनिट सज्ज राहतील अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी माता रामबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेल युनिटच्या उद्धघाटनावेळी दिली. नवीन सायबर सेल युनिटला सर्व साधन सामुग्रीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अर्थसहाय्य घेण्यात आल्याचे फणसळकर यांनी या कार्यक्रमावेळी सांगितले.

मुंबईत वाढत्या सायबर गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘सायबर शिल्ड’ या नावाने तयार केलेल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मुंबईतील १३ परिमंडळात नवीन सायबर सेल युनिटची निर्मिती करण्यात आली आहे. या १३ सायबर सेल युनिटचा उदघाटन सोहळा शुक्रवारी दुपारी ४ वाजता मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान येथील प्रेरणा हॉल या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली, बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबईत नव्याने करण्यात आलेल्या १३ सायबर सेल युनिटला लागणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तसेच इतर सर्व साधन सामुग्रीसाठी सेट बँक ऑफ इंडियाकडून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

New Project 2023 07 28T205721.819

मुंबई हे देशातील पहिले असे शहर आहे की, सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २००७ मध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील पहिल्या सायबर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर जसजसे सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली तसतसे प्रत्येक पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सायबर सेल विभाग सुरु करण्यात आले. कालांतराने सायबर गुन्ह्याच्या वाढता पसारा बघून मुंबईतील पाच वेगवेगळ्या प्रादेशिक पोलीस विभागात सायबर पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली. मुंबईत ९७ पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्यात दररोज अंदाजे ४ ते ५ सायबर गुन्ह्याची नोंद होत आहे. सायबर गुन्हेगारांकडून वापरले जाणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर, हार्डवेअरच्या तुलनेत या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांकडे असणारी साधन सामुग्री यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावते आहे.

(हेही वाचा – श्रावण हर्डीकर यांच्याकडील अतिरिक्त आयुक्त (शहर) विभागाचा कारभार पी वेलरासू यांच्याकडे)

मुंबईत असणाऱ्या पाच सायबर पोलीस ठाण्यावर असणारा ताण कमी करण्यासाठी मुंबईतील १३ परिमंडळात सायबर सेल युनिटची स्थापना करण्यात आली आहे. एका परिमंडळात असणाऱ्या पोलीस ठाण्यांमधील सायबर सेल विभागाच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक मदत करण्यासाठी या युनिटची स्थापना करण्यात आली आहे. सायबर सेल युनिट हे प्रत्येक परिमंडळातील पोलीस ठाण्यातील सायबर गुन्ह्याच्या संदर्भात तांत्रिक मदत केली जाणार आहे. प्रत्येक सायबर सेल युनिटमध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एक अधिकारी आणि चार अंमलदार असतील. या अधिकारी आणि अंमलदाराला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, या युनिटकडून सायबर गुन्ह्यांसंदभात शाळा, कॉलेज आणि गृहनिर्माण संकुल या ठिकाणी जनजागृती करतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली. सायबर सेल युनिटच्या उद्धघाटन सोहळ्यास पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा आणि बँकेचे इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.