विधानसभेत शुक्रवारी पर्यावरणासंबंधी विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजपा आमदार अमित साटम यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. मुंबईच्या गोरेगावात २०१३ मध्ये एका बिल्डरचा ५०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीत आला होता. त्यावेळी मी विरोध केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला एका मोठ्या व्यक्तीचा फोन आला, ‘अरे अमित, कशाला विरोध करतो. मी सांगतो ना सुनीलला. तुम्ही जाऊन बसा आणि मिटवा’, असा निरोप त्यांनी मला दिला, असा गौप्यस्फोट साटम यांनी केला. त्यामुळे अमित साटम यांना निरोप देणारा ‘तो’ नेता कोण, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
साटम म्हणाले, वृक्ष प्राधिकरण समितीचा प्रमुख हा मुंबई महापालिकेचा आयुक्त असतो. या समितीत एखादा ठराव पारित झाला, तरी तो अंतिम नसतो. तो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येतो. त्यावर ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हरकत घेतली. ते म्हणाले की, ट्री ॲथोरिटीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येत नाहीत. आपण १८२८ चा कायदा तपासा, त्यात असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. वृक्षप्राधिकरण हे स्वायत्त आहे, आयुक्तांकडेच याबाबतचे सर्व निर्णय असतात.
प्रभू यांच्या हरकतीवर साटम यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी पुराव्यासह त्याचे स्पष्टीकरण देतो. मी हे बोलणार नव्हतो. पण आता सगळंच बोलतो. वृक्ष प्राधिकरण समितीत पारित झालेला प्रत्येक प्रस्ताव हा मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभेत येतो, हे सुनील प्रभू तुम्ही विसरला असाल. गोरेगाव परिसरातील एका विकासकाचा ५०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये वृक्ष प्राधिकरण समितीत आला होता. त्याला मी आणि मनीषा चौधरी यांनी विरोध करत सभात्याग केला होता. त्यानंतरही तत्कालीन आयुक्तांनी (जे आयुक्त मागच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार होते) तो मंजूर केला होता.
(हेही वाचा – Conjunctivitis : डोळे आलेत का…? अशी घ्या काळजी)
तो प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आला. त्यावेळी मुंबईचे महापौर हे सुनील प्रभू होते. त्या सभेचा इतिवृत्तांत काढा. मी खोटं बोलत असेन किंवा चुकीचं बोलत असेल तर माफी मागेन. त्यावेळी भाजपच्या ३२ नगरसेवकांनी त्या प्रस्तावाला विरोध करीत सभात्याग केला. विरोध करूनही तो प्रस्ताव मंजूर झाला. आम्ही केलेल्या विरोधानंतर दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या. त्यावेळी सकाळी नऊ वाजता मला एका मोठ्या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी विचारलं की, ‘अरे, अमित काय झालं तुला? काय प्रॉब्लेम आहे? कशाला विरोध करतो? मी सांगतो ना सुनीलला, तुम्ही जाऊन बसा आणि मिटवा.’ आता ते या सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांचं नाव घेत नाही, असेही साटम म्हणाले. त्यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप नोंदवत गदारोळ केला.
पर्यावरणवादाचे नुसते ढोंग
अमित साटम म्हणाले, पर्यावरणाचा त्यांना एवढाच पुळका होता, तर गोरेगावची ५०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव का पारित झाला? या प्रस्तावाला विरोध करू नका म्हणून अनेक प्रकारचे दबाव आणले. पण आम्ही ठाम राहिलो. पुढच्या दिवशी आम्ही घटनास्थळाला भेट दिली होती. त्यामुळे हो पर्यावरणवादाचे बोगस ढोंग २०१९-२०२२ दरम्यानचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community