Landsliding : महाराष्ट्राला भूस्खलनाचा धोका

192
  • नित्यानंद भिसे

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा देशावर प्रतिकूल परिणाम घडवत आहे. त्याचा मोठा फटका उत्तराखंडमधील जोशीमठाला २०२२ साली बसला. या ठिकाणी २००० घरे असलेल्या डोंगराळ भागतील वस्त्या रिकाम्या करण्याची वेळ आली आहे. तिथे कधीही दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. मात्र आता देशभरातील अन्य राज्यांत कुठे जोशीमठ आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

१९ जुलै २०२३ रोजी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली, ज्यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. याआधी २२ जुलै २०२१ रोजी अशीच दुर्घटना महाडमधल्या तळीये गावात घडली होती. दरड कोसळल्यानंतर जी हानी झाली होती, त्यात चार दिवस मातीच्या ढिगाऱ्यातून मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. ३० जुलै २०१४ रोजी पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात दरड नाही तर अख्खा डोंगर कोसळला होता. हे गाव एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले होते. या घटनांची चर्चा होते, मदत जाहीर केली जाते, पुनर्वसनाच्या गोष्टी होतात. पण गेल्या काही वर्षांत दरड कोसळणे, भूस्खलनासारख्या घटना का वाढत आहेत याचा विचार होतोय का?

भूस्खलन म्हणजे काय?

डोंगर कड्यावरून दरड किंवा खडक कोसळणे, जमीन खचणे अशा घटनांना आपण भूस्खलन म्हणतो. याचा वेग इतका असतो की त्याच्या प्रवाहात येणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा जीवाला आपल्यासोबत घेऊन जाते. भूस्खलनाचा अंदाज लावणे हे सहज शक्य नसते. त्यामुळेच त्यावर तात्काळ उपाययोजना शक्य होत नाही. भूस्खलनाचे वहन, स्खलन, डोंगरकड्यावरून खडक कोसळणे असे अनेक प्रकार असतात. सावकाश होणाऱ्या स्खलनाचा अंदाज काढणे शक्य नसते. याचा वेग फारच कमी असतो. जमीन खचणे हा प्रकार हळूवार किंवा सावकाश होणारे भूस्खलन होय.

राज्याचा १५ टक्के भाग हा दरडप्रवण क्षेत्र आहे. यात नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना दरड कोसळण्याचा धोका आहे. या जिल्ह्याच्या घाट परिसरात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या प्रकरणी २००६ साली तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या अहवालात सांगितले की, भूस्खलन ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानवनिर्मित कारणांमुळे भूस्खलन होते. कठीण पाषाणांमध्ये निर्माण झालेल्या भेगा आणि फटी विस्तारित होऊन खडकांचे तुकडे वेगळे होऊ लागतात. अशा प्रकारे खडक उतारी भागात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे किंवा भूस्खलन म्हणतात. याशिवाय मानव निर्मित कारणेही जबाबदार असल्याचे या समितीने म्हटले होते. उतारी भागाच शेतीसाठी सपाटीकरण करणे, तसेच रस्ते बांधणे आणि त्यांचे रुंदीकरण याचा समावेश आहे आणि अतिपर्जन्याच्या काळात उताराचे सपाटीकरण केलेल्या भागात पाणी मुरण्याच्या प्रक्रियेतही अशा दुर्घटना घडतात.

(हेही वाचा मोदी-शहांचा विरोध करताना I.N.D.I.A आघाडीकडून भारतमातेचा अवमान; सोशल मीडियात टीकेची झोड)

भूस्खलनाची कारणे कोणती?

  • भूस्खलनात पाण्याचे कार्य फार महत्त्वाचे आहे. पाणी हे नैसर्गिक वंगणासारखे आहे. जेव्हा जमिनीत पाणी जाते तेव्हा ते मातींच्या कणांमधील घर्षण कमी करते. तसेच या पाण्यामुळे जमिनीत छिद्रीय बल निर्माण होते. यामुळे जमिनीची दाब झेलण्याची क्षमता कमी होते. त्यावर बांधकाम केल्यास भूस्खलन होऊ शकते.
  • भूगर्भातील काही रचनाही भूस्खलनास कारणीभूत ठरतात. भूगर्भात विविध प्रकारचे खडक आहेत. काही खडक कठीण, तर काही खडक ठिसूळ असतात. तसेच भूगर्भांत सतत हालचाली होत असतात, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ताण पडतो. यामुळे भूस्खलन होऊ शकते.
  • ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीच्या हालचाली होतात. यातून बाहेर पडलेला मॅग्मा आणि खडक उतारावर पडत असतात आणि तेथे भूस्खलन होते.
  • मानवी कारणांमुळे भूस्खलन होते. अती खोदकाम केले तर जमिनीत हादरे निर्माण होतात, त्यामुळे तिथे भेगा तयार होतात. बोगदा खणताना कधी कधी स्फोटकांचाही वापर केला जातो. त्यामुळे जमीन कमकुवत होऊ शकते. बऱ्याचदा बांधकाम करताना वृक्षतोड केली जाते. अमर्याद वृक्षतोडीमुळे भूस्खलन होऊ शकते.

भूस्खलनाचा धोका कसा कमी करता येईल?

  • पाणी हे भूस्खलनामागील सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणे हा भूस्खलन थांबवण्याचा एक उपाय आहे. यासाठी उतारावर पाण्याचे पाईप टाकून सर्व अतिरिक्त भूजल त्या पाइपमधून वाहून जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे.
  • भूस्खलन थांबवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे उतारांवर संरक्षक भिंती बांधणे. संरक्षक भिंती बांधल्यामुळे उताराच्या वरील भागात जरी भूस्खलन झाले तरी, भिंतींमुळे ते अडून राहते आणि अपघाताची शक्यता कमी होते.
  • आणखी एक उपाय म्हणजे खडकांचे बोल्टिंग करणे. खडकांमध्ये मोठे बोल्ट्स ठोकून त्याच्यात लोखंडाची जाळी लावली जाते. त्यामुळे पडणारे खडक लोखंडी जाळीत अडकतात आणि खाली पडत नाही.
  • संरक्षक भिंत बांधणे शक्य नसेल तर उतारावर खड्डे खणून त्यांच्यात उच्च दाबाने काँक्रीट भरले जाते. याला ग्युनाटिंग म्हणतात. त्यामुळे जमिनीत घर्षण वाढते आणि भूस्खलन होत नाही.
  • वनीकरणामुळे भूस्खलनापासून संरक्षण करता येऊ शकते. कारण झाडांची मूळे जमीन घट्ट धरून ठेवतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.