Sansad : मणिपूरवरून संसदेचे कामकाज आठव्या दिवशीही ठप्प

146

मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील हमरीतुमरीमुळे पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस सुध्दा व्यर्थ गेला. सभागृहात जोरदार गोंधळ होत असल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस. मागील सात दिवसांपासून मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर चर्चा घेण्याच्या मुद्यावरून संसदेत गोंधळाचे वातावरण आहे. आजचा आठवा दिवसही गोंधळाचा ठरला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर सभागृहात अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली. मात्र ही चर्चा नियम 267 अंतर्गत व्हावी या मागणीवर विरोधक अडून बसले आहेत. यावेळी झालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, दोन वाजेपर्यंत, अडीच वाजेपर्यंत अशा तीनवेळा थांबविल्यानंतर शेवटी चौथ्यांदा दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हीच मागणी लोकसभेत रेटून लावल्यामुळे येथील कामकाज सुध्दा वारंवार तहकूब करावे लागले.

(हेही वाचा Governor Appointed MLC : राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी सरकारला 21 ऑगस्टपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश)

राज्यसभेतील सत्तापक्ष नेते पियूष गोयल म्हणाले की, मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार नियम १७६ अंतर्गत चर्चा घेण्यास तयार आहे. आज चर्चा सुरू होईल आणि मंगळवारीही सुरूच राहील असे सरकारने म्हटले आहे. दुपारी दोन वाजेपासून चर्चेला सुरुवात करण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. मात्र, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, सत्य बाहेर येऊ देत नाहीत, असा आरोप गोयल यांनी केला. महत्वाचे म्हणजे, लोकसभा आणि राज्यसभेतील अल्पकालीन चर्चेला विरोधी पक्षांचा विरोध आहे. शिवाय पंतप्रधान मोदींच्या विधानाच्या मागणीवर अडून आहेत. ‘इंडिया’प्रमाणे एनडीएने सुध्दा मणिपूरला जाण्याची गरज आहे आणि खरी हकीकत जाणण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘मी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांना विनंती करतो की कृपया सभागृहात या आणि चर्चेत सहभागी व्हा. या विषयांवर चर्चा करण्यासाठी सरकार पहिल्या दिवसापासून तयार आहे’.

दिल्ली विधेयक मंगळवारी 

मणिपूरच्या मुद्यावरून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे दिल्ली अध्यादेशाशी संबधित विधेयक आज सरकारला सभागृहात मांडता आले नाही. हे विधेयक आता उद्या मंगळवारी लोकसभेत मांडले जाईल, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोश यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे, आम आदमी पक्षाचे चीफ व्हीप सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत व्हीप जारी केला आहे. यामुळे आपच्या सर्व राज्यसभा खासदारांना ४ ऑगस्टपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.