अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) संख्याबळ कमी झाल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. मात्र, अधिवेशनाचे दोन आठवडे सरले तरी अद्याप विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचीही निवड झालेली नाही. काँग्रेसमधील या घोळाचा सत्ताधारी पुरेपूर फायदा उचलत असून, विरोधीपक्ष नेता नसल्याने ‘मविआ’ची धार बोथट झाल्याचे चित्र आहे.
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शरद पवार गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. परिणामी, काँग्रेसकडे संख्याबळ असल्याने विरोधी पक्षनेतेपद या पक्षाकडे जाऊ शकते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिवेशनापूर्वी सांगितले. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी १७ जुलैपासून सुरू झाले. नवी दिल्लीतून नाव आल्यावर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला जाईल, असे पटोले यांनी जाहीर केले होते. अधिवेशनाच्या दोन आठवड्यांचे कामकाज संपले, पण काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर अद्याप दावा केलेला नाही.
(हेही वाचा Manipur Violence : मणिपूरच्या घटनेवर सरन्यायाधीश म्हणाले, ही पहिलीच घटना नाही, दोन्ही बाजू समजून घेणार)
४ ऑगस्टला पावसाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत तरी काँग्रेस हायकमांड विरोधीपक्ष नेत्यासाठी हिरवा कंदील दाखवते, की पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेतेविना पार पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
घोडे अडले कुठे?
- विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड करायची यावरून पक्षात एकमत झालेले नाही. विद्यमान विधिमंडळ गटनेते नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे.
- विरोधी पक्षनेतेपदासाठी आपण इच्छुक नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कळविले आहे. चव्हाण यांनी वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह धरल्याचे समजते.
- अंतिम निर्णय हायकमांड घेणार असून, त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीला पाचारण केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.