मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे २०१९-२० मधील एमबीबीएसच्या मागास व आर्थिक मागास विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शिष्यवृत्तीसाठीच्या अंतिम तारखेच्या चार दिवस अगोदर महाविद्यालयाकडून शुल्क भरण्यासंदर्भातील नोटीस जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरून महाडीबीटीवर शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुग्णालयातील जवळपास ७० ते ८० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २०१९-२० मध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडून २६ फेब्रुवारी २०२० रोजी नोटीस जाहीर केली. यामध्ये शुल्क भरण्यासाठी ११ मार्च २०२० पर्यंत मुदत दिली होती. परंतु मागास व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी २९ फेब्रुवारपर्यंत मुदत दिली होती. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी शुल्क भरणे आवश्यक असते. मात्र शुल्कासंदर्भातील नाेटीशीनंतर विद्यार्थ्यांकडे वार्षिक शुल्क भरता येईल एवढे पैसे तात्काळ नसल्याने व बँकेचा डीडी काढून शुल्क भरणे तसेच शिष्यवृतीचा अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर २९ फेब्रुवारीपर्यंत जमा करणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. परिणामी सर्व विद्यार्थ्यांनी १९ मार्चपर्यंत महाविद्यालयाचे शुल्क भरूनही जवळपास ७० ते ८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले.
(हेही वाचा Court : न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा डोंगर; महाराष्ट्रात 58 लाख 21 हजार खटले प्रलंबित)
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व कार्यालये व महाविद्यालये बंद राहिली. त्यामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना दाद मागता आली नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत महाविद्यालय व समाज कल्याण विभागाकडे वारंवार चौकशी केली, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. वेळेवर शुल्क भरून विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले आहे. तसेच महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरण्यास सांगण्यात येत असून, दंडाच्या रकमेसह शुल्क न भरल्यास त्यांना शैक्षणिक कागदपत्रे दिली जाणार नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community