Congress : शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या सत्कार सोहळ्याला जाऊ नये म्हणणारी काँग्रेस बॅकफूटवर

130

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाऊ नये, असे म्हणणारी काँग्रेस आता बॅकफूटवर आली आहे. शरद पवार माघार घेणार नाहीत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल केला आहे. या कार्यक्रमाला पवारांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

शरद पवार यांनी मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचा आग्रह होता. तरीही पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे मविआच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र, पवारांनी मविआच्या शिष्टमंडळाची भेट नाकारली आहे. त्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर आली आहे. काँग्रेस नेत्यांनी आपल्या भूमिकेत बदल करीत, शरद पवार या कार्यक्रमाला जातच असतील तर त्यांनी मोदींची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

(हेही वाचा Court : न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा डोंगर; महाराष्ट्रात 58 लाख 21 हजार खटले प्रलंबित)

यासंदर्भात प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, मोदींच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच असतील तर त्यांनी आपल्या शिष्याची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा आहे.

असा झाला भूमिकेत बदल

ज्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आपले गुरु आहेत, त्यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे म्हटले होते. आता पुण्यात एका कार्यक्रमात गुरु-शिष्य एकत्र येतच आहेत तर, नरेंद्र मोदी जे काही करत आहेत ते लोकमान्य टिळकांच्या विचारसणीच्या विरोधात आहे, अशी कानउघाडणी गुरु शरद पवार यांनी शिष्य नरेंद्र मोदी यांची करावी, ही आमची अपेक्षा आहे, असे अतुल लोंढे म्हणाले. दरम्यान, सकाळपर्यंत ताठर भूमिका घेणाऱ्या काँग्रेसचा विरोध अचानक का मावळला, भूमिकेत बदल का व कोणामुळे झाला, अशा चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.