शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याची काही काळ चर्चा झाली. कारण रोहित पवारांनी आपल्या आजोबांचे समर्थन करताना जे वक्तव्य केले, त्यातून अजब तर्कट समोर आले. 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मोदींना लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टिळक पुरस्काराच्या मुद्द्यावर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट यांनी राजकारण उकरून काढत पवारांना टार्गेट केले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवारांनी मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करू नये. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसू नये, असा आग्रह संजय राऊत, वर्षा गायकवाड, वंदना चव्हाण यांच्यासह अनेक पुरोगाम्यांनी धरला आहे. त्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतल्या स्थानिक नेत्यांचे शिष्टमंडळ पवारांना भेटायला “1 मोदी बाग” या निवासस्थानी जाणारही होते. पण पवारांनी त्यांना भेटायलाच नकार देऊन टाकला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांमध्ये राजकीय भूकंप झाला.
आजोबांचे समर्थन
या पार्श्वभूमीवर आपल्या आजोबांच्या समर्थनासाठी रोहित पवार पुढे आले. त्यांनी पवारांच्या टिळक पुरस्कार कार्यक्रमातल्या उपस्थितीचे समर्थन केले. टिळक पुरस्काराचा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे, असे सांगताना रोहित पवारांनी औचित्य भंग करत सावरकरांचा विषय पुढे आणला. टिळक पुरस्काराचा कार्यक्रम पूर्ण वेगळा आहे, त्यामुळे पवार साहेब त्याला उपस्थित राहणार आहेत. तिथे जर वीर सावरकरांचा किंवा संघाचा कार्यक्रम असता, तर पवार साहेबांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विनंती आपण त्यांना केली असती, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे.
(हेही वाचा PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा असा असणार पुणे दौरा)
पण हे वक्तव्यच मूळात वादग्रस्त आहे, हे रोहित पवारांनी लक्षात घेतलेले नाही. किंबहुना हे वक्तव्य करताना रोहित पवार आपल्याच आजोबांचा जुना आणि नवा राजकीय इतिहास देखील विसरले आहेत. एक तर रोहित पवारांनी ज्या अर्थाने सावरकरांच्या कार्यक्रमाला पवारांनी जाऊ नये, असे म्हटले आहे, तो अर्थच मूळात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला गैरलागू आहे. शिवाय रोहित पवारांच्या वक्तव्यातून ज्या प्रकारचा सावरकर विरोध ध्वनीत होतो, त्या अर्थाने शरद पवारांनी कधीच सावरकरांचा विरोध केलेला आढळत नाही. पवार मुख्यमंत्री असतानाचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातले भाषण युट्युब वर उपलब्ध आहे. त्यात त्यांनी वीर सावरकरांना आद्य स्वातंत्र्यवीर अशा गौरवपूर्ण शब्दांमध्ये संबोधले आहे. इतकेच नाही, तर वीर सावरकरांवर शरद पवार कधीच “राहुल बुद्धीने” टीका करत नाहीत. वीर सावरकरांच्या सामाजिक योगदानाचा, त्यांच्या गाई विषयक तत्त्वज्ञानाचा पवार नेहमी पुरस्कार करत आले आहेत. पवारांचा वीर सावरकरांच्या हिंदुत्वाला विरोध आहे. तो त्यांनी नोंदवलाही आहे.
राहुल गांधींना पवारांनी सुनावले होते
इतकेच काय पण विरोधी “इंडिया” आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जेव्हा 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती, त्यावेळी पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना वीर सावरकरांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली होती. राहुल गांधींनी वीर सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय अनावश्यकपणे उगाळू नये. तो “बॅकफायर” होऊ शकतो, असा गंभीर इशारा पवारांनी त्या बैठकीत दिला होता. तशा बातम्या सर्व प्रसार माध्यमांमध्ये तेव्हा प्रसिद्धही झाल्या होत्या.
Join Our WhatsApp Community