Chatrapati Shivaji Maharaj Udyan : छत्रपती शिवाजी महाराज मैदानासह आसपासच्या भागातील विद्युत रोषणाईचा खर्च गेला वाया?

169

मुंबई सुशोभिकरणाअंतर्गत विविध भागांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज मैदानासह दादर रेल्वे स्थानकाजवळील पदपथावरील पोलवर बसवलेले एलईडीचे दिवे तसेच पोर्तुगिज चर्चजवळील रस्त्यावर आकर्षक रोषणाई आदी प्रकारची कामे करण्यात आली होती. या तिन्ही ठिकाणच्या विद्युत रोषणाईवर तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात या विद्युत रोषणाईचा प्रकाश कुठेच दूरवर दिसून येत नाही.

मुंबई सुशोभिकरण अंतर्गत विद्युत रोषणाईंची कामे विविध ठिकाणी हाती घेऊन एकप्रकारे झगमगत्या मुंबईचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला होता. या अंतर्गत महापालिकेच्या जी उत्तर विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग आदी भागांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या मैदान परिसरात आकर्षक रंगाची विद्युत रोषणाई तर वीर सावरकर मार्गावरील विजेच्या खांबावर जास्वंदीच्या फुलांचे डिझाईन बनवून त्याद्वारे विद्युत रोषणाई तसेच दुभाजकावर गुलाबाच्या फुलाच्या प्रतिकृतीमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यातील मैदान परिसरातील विद्युत रोषणाईचा अंध:कार पसरलेला असून जास्वंदच्या प्रतिकृती या रोषणाई होताना दिसत आहे. त्यामुळे यासर्वांसाठी ६१ लाखांचा खर्च करण्यात आला होता.

(हेही वाचा Gyanvapi : ज्ञानवापी प्रकरणी मुख्यमंत्री योगी म्हणाले, मुस्लिम पक्षाने पुढे येऊन ऐतिहासिक चूक झाल्याचे सांगावे)

तर दादर रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट मार्गावरील केशवसुत उड्डाणपूल, रानडे मार्ग आदी रस्त्यावरील विद्युत दिव्यांच्या खांबावर आकर्षक एलईडी दिव्यांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. यासाठीही ५२ लाख ४६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.  परंतु प्रत्यक्षात अनेक खांबावरील या प्रतिकृती बंद पडलेल्या असून त्यांची साधी देखभालही होत नाही की बंद पडलेले दिवे बदले जात आहे. त्यामुळे एकदा लावलेल्या या आकर्षक प्रतिकृती चालू स्थितीत आहे किंवा नाही याची योग्यप्रकारे काळजीही घेतली जात नाही.

तसेच पोर्तुगिज चर्चजवळील रस्त्यावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली असून यासाठी १ कोटी ४५ लाख ५० हजार ७४८ रुपये खर्च करण्यात आले आहे.  त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या विद्युत रोषणाईवर अडीच कोटींहून अधिक खर्च करूनही प्रत्यक्षात याचा वापर फारच कमी दिसून आल्याने हा सर्व खर्च नाहकपण वायाच गेल्याचे ऐकायला मिळत आहे.

अशाप्रकारे केला विद्युत रोषणाईवर खर्च

  • छत्रपती शिवाजी महाराज मैदान, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (६१ लाख १६ हजार ५५९ रुपये)
  •  दादर रेल्वे स्टेशनजवळील पदपथावरील पोलवर एलईडीचे दिवे ( ५२ लाख ४६ हजार ७१२ रुपये)
  • पोर्तुगिज चर्चजवळील रस्त्यावर आकर्षक रोषणाई ( १ कोटी ४५ लाख ५० हजार ७४८ रुपये)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.