- सचिन धानजी, मुंबई
२३ मे २०२३ रोजी महापालिका मुख्यालयातील जी २० शिखर परिषदेच्या पाहुण्यांच्या एका आदरतिथ्यावरच तब्बल १ कोटींहून अधिक खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेच्या मुख्यालयात या पाहुण्यांनी केलेले हेरिटेज वॉक, आपत्कालिन नियंत्रण कक्षाला दिलेली भेट या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी आणि पाहुणचारासाठी केलेल्या या सर्व खर्चाची माहितीच आता माहिती अधिकारातून समोर आली आहे.
जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखमी सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने मंगळवारी २३ मे २०२३ रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही अभ्यास दौरा या शिष्टमंडळाने केला. मुख्यालयाची भव्यदिव्य व नेत्रदीपक वास्तूरचनाही या शिष्टमंडळातील सदस्यांनी न्याहाळली. आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह नियंत्रण कक्षाच्या कामकाजा बाबतचीही माहिती घेतली.
या शिष्टमंडळातील सदस्यांच्या महापालिका मुख्यालयातील आगमनाच्या तयारीसह आदरतिथ्यासाठी एकूण केलेल्या खर्चाची माहिती विविध संबंधित विभागांकडून माहिती अधिकाराच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यामध्ये महापालिका जनसंपर्क कार्यालय, राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी कार्यालय, प्रमुख अभियंता (महापालिका मुख्यालय इमारत) आदी विभागांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही विभागांच्या माध्यमातून सुमारे ८८ लाख रुपये आणि महापालिका मुख्यालयासमोरील परिसरातील विविध कामांसाठी ए विभागाने केलेल्या कामांसाठी झालेला इतर खर्च पाहता एकाच दिवसांच्या या आदरतिथ्यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
अशाप्रकारे झाला आदरतिथ्यावरील खर्च
- रांगोळी, सजावट, लेझीम तुतारी : ८ लाख ८९ हजार रुपये
- चंदनाचे मोठे हार : ३८ हजार ५०० रुपये
- किपर : ११ हजार २१० रुपये
- छायाचित्र प्रदर्शन सांताक्रुझ ग्रँट हयात हॉटेल : १९ लाख ९४ हजार रुपये
- छायाचित्र आणि व्हिडीओ चित्रण : ८ लाख ८८ हजार रुपये
- आपत्कालिन नियंत्रण कक्ष : २ लाख ०४ हजार रुपये
- राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी कार्यालय खर्च : १५ लाख ०९ हजार रुपये
- कार्यकारी अभियंता मुख्यालय कार्यालय
- भेटीच्या तयारीसाठी विविध साहित्यांचा पुरवठा आणि उभारणी : १ लाख ८२ हजार रुपये
- विविध प्रकारचे विद्युत दिवे, केबल्स, लाईट हंडी : १ लाख ९३ हजार
- मुख्यालयातील अंतर्गत सौदर्यवर्धक प्रकाश रोषणाई बदली करणे : ३१ लाख रुपये