राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे रिक्त झालेल्या विरोधीपक्ष नेतेपदावर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बाळासाहेब थोरात यांना गटनेते पदी कायम ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी १७ जुलैपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. मात्र, अधिवेशनाचे दोन आठवड्यांचे कामकाज संपले तरी विरोधी पक्षनेता घोषित केला जात नसल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता या पदावर वडेट्टीवार यांची निवड करीत काँग्रेसने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या जागी वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव त्यांच्या गाठीला आहे. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांना गटनेते पदी कायम ठेवत काँग्रेसने मराठा आणि ओबीसी असे समीकरण साधले आहे.
(हेही वाचा – दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई IIT उपाययोजना सुचवणार – मुख्यमंत्री शिंदे)
‘हे’ होते दावेदार
विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमधून विजय वडेट्टीवार यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुनिल केदार, संग्राम थोपटे इच्छुक होते. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रह धरल्याने हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. दरम्यान, काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षांना वडेट्टीवार यांच्या निवडीचे पत्र दिले जाईल. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासंदर्भात निर्णय घेतील. पावसाळी अधिवेशनाचे केवळ तीन दिवसांचे कामकाज शिल्लक असल्यामुळे चालू अधिवेशनात अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेत्याची घोषणा होते, की हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community