राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून मुंबई, पुणे आणि नागपूर या महत्वाच्या शहरातील आकडेवारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यात पुण्यात सर्वाधिक रुग्ण सापडत असून, या वाढत्या रुग्णांमुळे ऑक्सिजन बेडची देखील कमतरता जाणवू लागली आहे. विशेष बाब म्हणजे पुण्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
अजित पवार आज पुण्यात
पुण्याची वाढलेली आकडेवारी पाहता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुण्यात असून, वाढत्या कोरोना आकडेवारी बाबत ते बैठक घेत आहेत. पुण्यात लॉकडाऊन घ्यायचा की कठोर निर्बंध लावायचे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवार यांच्याकडून २ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम देण्यात येणार आहे. २ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असेही अजित पवार यांनी या बैठकीत सांगितले आहे. तसेच त्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले आहेत.
(हेही वाचाः कोरोनाबाधितांची माहिती महापालिकेलाच नाही…)
ही आहे पुण्यात बेडची संख्या
सर्वसाधारण बेड– 906,
शिल्लक- 249
ऑक्सिजन बेड– 3344, शिल्लक- 378
अतिदक्षता बेड– 322, शिल्लक- 27
व्हेंटिलेटर बेड- एकूण 445, शिल्लक- 30
मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बोलावली बैठक
देशातल्या कोरोना आकडेवारीतील 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे हे महाराष्ट्राचे आहेत. यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षावरुन जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, लॉकडाऊन बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community