तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्माला पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे हार्दिक पंड्या हा टॉससाठी आला होता. वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आणि त्यानंतर हार्दिकने आपला संघ जाहीर केला. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात नसल्याचे त्याने स्पष्ट केले. त्याचबरोबर यावेळी दोन बदल संघात केल्याचे त्याने सांगितले.
तिसरा वनडे सामना हा निर्णायक असणार आहे. कारण आतापर्यंत मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे जो संघ हा तिसरा सामना जिंकेल त्यांना मालिका विजय मिळवता येईल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असाच असेल. त्यामुळे या सामन्यात नेमकी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता सर्वांना होती. हार्दिक पंड्याने या सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकट यांना संधी देण्यात आली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम वन-डे क्रिकेट सामना आज, मंगळवारी होणार आहे. संघात प्रयोग केल्याने भारतीय संघाला दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र, तरीही संघात खेळाडूंच्या निवडीचे प्रयोग सुरूच राहणार असल्याचे भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले आहे. त्यामुळे तिसऱ्या वन-डेत सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांच्या फलंदाजीचा उपयोग मधल्या फळीत करून घेण्याचा प्रयोग होऊ शकतो. अर्थात, आता प्रयोग महत्त्वाचा की मालिका जिंकणे, हा प्राधान्यक्रम संघव्यवस्थापनाला ठरवावा लागणार आहे.
भारतीय संघाने २००६ नंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका गमावलेली नाही. ही मालिका गमावण्याचे दडपण भारतावर असेलच. दुसऱ्या वन-डेतून रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगलट आला होता. मात्र, आशिया कप आणि वर्ल्ड कपआधी संघातील गुणवत्तेला पारखण्याची ही अखेरची संधी आहे. तेव्हा पुन्हा एकदा फलंदाजीच्या क्रमात बदल दिसू शकतो. तेव्हा मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा युवा खेळाडूंचा प्रयत्न असेल. यात सूर्यकुमार यादवला वन-डेतील स्थान निश्चित करण्यासाठी छाप पाडावी लागणार आहे. तिसऱ्या वन-डेत भारतीय संघाच्या जेतेपदाचा शिल्पकार होत आपली पुढील वाटचाल सोपी करण्यावर त्याने भर द्यायला हवा. फारशी संधी न मिळणाऱ्या संजू सॅमसनलाही या मालिकेद्वारे संधी मिळते आहे. याचा त्याने पुरेपूर फायदा उठवायला हवा. दुसऱ्या वन-डेप्रमाणे त्याला तिसऱ्या वनडेतही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी मिळू शकते.
Join Our WhatsApp Community