Ganeshotsav : मूर्तिकारांसह गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना केवळ १०० रुपयेच भरावे लागणार अनामत रक्कम

162

गणेश मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानगीसाठी असलेली  एक हजार रुपयांची अनामत रक्कम कमी करून ती रक्कम १०० रुपये करण्याची मागणी उपनगर आणि शहर दोन्ही पालकमंत्र्यांनी केल्यानंतर प्रशासनाने ही मागणी मान्य केली आहे. तसेच बाजारात चिनी बनावटीच्या गणेश मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने या मूर्तींवर प्रतिबंध घालण्यासाठी पावले उचलण्याची पालकमंत्र्यांच्या उपस्थित समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मूर्तीकरांनी केल्यानंतर मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. त्यामुळे मंडपासाठी आकारले जाणारे एक हजार रुपयांची अनामत रक्कम आता केवळ १०० रुपये एवढीच आकारली जाणार असून चिनी बनावटीच्या गणेशमूर्तींवरही कारवाई करून मूर्तिकारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी संदर्भात मंगळवारी १ ऑगस्ट २०२३ रोजी महापालिका मुख्यालयात  उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. यावेळी गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत व  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले. त्यात गणेश मूर्तिकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली १००० रुपये असलेली  अनामत रक्कम कमी करून ती १०० रुपये करण्यात आली. तसेच गणेशोत्सवाच्या विसर्जन काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात यावी, ही मागणीही प्रशासनाने मान्य केल्याचे पालकमंत्र्यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

(हेही वाचा PM Mudra Yojana : 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत महाराष्ट्रात 52,53,324 कर्ज प्रकरणांना मंजुरी)

याबरोबरच चिनी बनवटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी पावले उचलण्याची मागणीही करण्यात आली आहे. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असला तरी पारंपरिक मूर्तीकारांच्या व्यवसायावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये यासाठी ही बंदी आवश्यक असल्याने प्रशासनानेही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबरोबरच विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची आणि प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळा महापालिकेच्या वतीने साफसफाई  करण्याचीही मागणी मान्य करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील. तसेच  गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जावी. शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवली जावी  तसेच पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जावे अशा मागण्यांही  प्रशासनाने मान्य केल्या आहेत. गत वर्षी विसर्जन मिरवणुकीतील विसर्जनास नेण्यात येणाऱ्या वाहनांवर / गणेश मिरवणुकीतील गणेश भक्तांवर पोलीस खटले दाखल केलेले आहेत. ते काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जावी, तसेच गणेश विसर्जनावेळी काही अडथळे आल्यास त्याकडे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

दरम्यान, यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काळ असल्याने गणेशोत्सव विसर्जनस्थळी गणेश भक्तांना मोदक अथवा पेढा प्रसाद म्हणून देण्याचे नियोजन करावे असेही पालिकेला सूचविल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी  यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र, अशी कारवाई महापालिका करणार होती त्यालाही आमचा विरोध होता. याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असाव्यात हा आग्रह चांगला आहे, मात्र एकाएकी निर्णय घेऊन एवढा मोठा बदल करता येणार नाही. त्यासाठी मूर्तीकारांना  काही वेळ द्यावा लागेल ,त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.