भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे अशा रीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत, त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
इतरत्र तात्पुरत्या कोरोना रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा आढावा घेणार!
वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयालादेखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी, असे निर्देश मी देत आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांच्याशी देखील ही दुर्घटना कळताच चर्चा केली. जखमी तसेच इतर कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहण्यास सांगितले.
(हेही वाचा : भांडुपच्या आगीत सनराइज रुग्णालयतील नऊ जणांचा होरपळून मृत्यू!)
महापालिकेचा ढिसाळपणा! – देवेंद्र फडणवीस
या मॉलमध्ये आग लागल्यानंतर रेस्क्यूसाठी जागा नव्हती. आगीबाबत अनेक संभ्रमाच्या गोष्टी आहेत. आग नेमकी कुठे लागली?, कशी लागली?, पीएमसी बँकेशी संबंध आहे?, काही दुकानदार सांगतात, आमची केस होती म्हणून आग लागली. अशा अनेक गोष्टी आहेत. ठिक आहे, या सर्व कथांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. त्याचे विश्लेषण करावे लागेल. जी घटना घडली आहे, त्यामध्ये महापालिकेचे दुर्लक्ष आणि ढिसाळपणा स्पष्ट दिसतोय, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकार फक्त घोषणा करते!
भांडूपच्या ड्रिम मॉलमध्ये लागलेल्या आगीची घटना अत्यंत गंभीर आहे. हे कोविड रुग्णालय या ठिकाणी तात्पुरते सुरु होते, या मॉलला ओसी नव्हती, असे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मात्र, भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. जी तात्पुरती रुग्णालये आहेत, त्यांचेही ऑडिट करणे आवश्यक होते, मात्र ते झाले नाही. सरकार केवळ घोषणा करते, असेही फडणवीस म्हणाले.
Dream Mall Bhandup Fire Sunrise Hospital statement of only 2 dead due to #COVID19 & Not Due to Fire, is BIG LIE. I fear there could be 9 human casualty I asked Bhandup Police to register Criminal Complaint & arrest Sunrise Hospital Owner @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis pic.twitter.com/38LxIaWouy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 26, 2021
शिवसेनेचा महापालिकेतील काळा चेहरा समोर! – अतुल भातखळकर
भांडुप येथील ड्रीम मॉलमधील आगीमुळे शिवसेनेचा महापालिकेतील पुन्हा एकदा काळा आणि बेशरमपणाचा मुखवटा समोर आला आहे. या मॉलची मालकी पीएमसी घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाधवान बंधूंची आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या मॉलच्या तिसऱ्या माळ्यावर कोरोना रुग्णालयाला महापालिकेने परवानगी दिली. याविरोधात तक्रार केली तरी सेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे केवळ हॉस्पिटलची चौकशी करून उपयोगाचे नाही, तर या हॉस्पिटलवर कुणाचा वरदहस्त होता, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. कारण या आगीत १० निष्पाप लोकांचा प्राण गेला आहे. या प्रकरणाची चौकशीही समयमर्यादेत व्हावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
रुग्णालयाच्या विरोधात तक्रार करून केले दुर्लक्ष! – संजय दिना पाटील
भांडुप येथील ड्रीम मॉलला लागलेल्या आगीमुळे त्याच्या तिसऱ्या मजल्यावरील कोविड रुग्णालयातील १० रुग्णाचा मृत्यू झाला, ही घटना घडताच माजी खासदार संजय दिना पाटील यांनी धक्कादायक माहिती समोर आणली. ज्यावेळी महापालिकेने या रुग्णालयाला परवानगी दिली. त्याच वेळी संजय दिना पाटील यांनी यासंबंधीच्या विविध परवानग्यांबाबत महापालिकाकडे लेखी पत्राद्वारे विचारणा केली. तेव्हा महापालिका अधिकाऱ्यांनी कोरोना काळ असल्याने या रुग्णालयाला तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. अंशतः भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असे सांगितले, तर अग्निशमन दलानेही याला परवानगी दिल्याचे सांगितले. असे होते तर इतका हलगर्जीपणा उघड होणारा प्रकार घडलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community