जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसाने पावसाळी आजारांमध्ये चांगलीच वाढ केली. गॅस्ट्रोचे जुलै महिन्यात 1 हजार 649 रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. मलेरियाचे 721, डेंग्यूचे 579 रुग्ण सापडले आहेत. लेप्टोचे रुग्णही आता 377 वर पोहोचले असून, हेपेटायटीसच्या रुग्णांची संख्या 138 पर्यंत पोहोचली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस्ट्रो हा पोटाचा आजार आहे. दूषित पाण्याचे सेवन झाल्याने गॅस्ट्रो बळावतो. २०१८ साली मुंबईत लेप्टो आजारामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने लेप्टो आजाराची चांगलीच धास्ती घेतली आहे. मच्छरांचा नायनाट करण्यासाठी घराच्या छप्परावर तसेच घरातील साचलेले पाणी सातत्याने बदलण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.
(हेही वाचा Ashish Shelar : आशिष शेलार मंत्री बनले? पालकमंत्र्यांच्या मधोमध खुर्चीत बसून घेतली महापालिकेत बैठक)
मुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने पोटाचा संसर्ग वाढत असल्याची तक्रार वाढू लागली आहे. सतत धोधो बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ढासळल्याची भीती व्यक्त होत आहे. पोटदुखी दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. यंदाच्या आठवड्यात पोटाच्या दुखण्याने हौराण झालेल्या रुग्णांमध्ये तीस टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुंबईत साचलेल्या पाण्याच्या नजीकच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊन पोटाची बाधा झालेले रुग्ण वाढत असल्याचेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करूनही काही रुग्णांना पटकन आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली.
काय काळजी घ्याल
- रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका
- साचलेल्या पाण्याजवळच्या नागरी वसाहतीतील माणसांनी आरोग्याची आवश्यक काळजी घ्या
- पाणी उकळून प्या
- तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस पोटदुखी असल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा