सतत दोन दिवस अहोरात्र रुग्णसेवेचे काम, जेवणाचा पत्ता नाही. एका निवासी डॉक्टराला क्षमतेपेक्षाही जास्त काम करावे लागते. परिणामी, वाढता शारीरिक ताण आणि मानसिक ताण निवासी डॉक्टरांना फारच त्रासदायक ठरू लागला आहे. केईएम मधील २७ वर्षीय निवासी डॉक्टराच्या आत्महत्या प्रकरणातून हा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने पुढे आला आहे. मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेतील अनेक माजी सदस्यांनी निवासी डॉक्टरांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहायची गरज व्यक्त केली.
मार्डचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध मनसोपचारतज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी वरिष्ठ डॉक्टरांकडून मिळणाऱ्या अपमानस्पद वागणुकीबाबत मुद्दा उपस्थित केला. डॉ. मुंदडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासी डॉक्टरांना रुग्णासमोरच अपमानास्पद भाषेत बोलले जाते. निवासी डॉक्टरांचा आत्मसन्मान दुखावला जातो. हे प्रकार टाळायला हवेत. या आत्महत्येनंतर पालिका आरोग्य प्रशासनानेही याप्रकरणी खात्रीलायक उपाय अवलंबले जातील असे आश्वासन दिले आहे. आम्ही वैद्यकीय सेवा देण्यात कुचकामी नाही परंतु आम्हाला सन्मानाने आणि आदराने वागवा अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली.
(हेही वाचा – सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंची गळफास घेत आत्महत्या, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट)
रुग्णालयातील आपत्कालीन आणि सर्जरी विभागात सर्वात जास्त ताण असतो. या दोन्ही विभागात रुग्ण कधीही अत्यावश्यक परिस्थितीत येतात. बरेचदा रुग्णसेवा देताना या भागात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. अपघातात अतिशय गंभीर दुखापत झालेल्या रुग्णाला हाताळताना वरिष्ठ निवासी डॉक्टरांना अशा आव्हानात्मक परिस्थितीतीत रुग्णाला आणि परिस्थितीला हाताळताना अत्यंत हीन दर्जाची वागणूक देतात, असे निवासी डॉक्टर्स सांगतात. बरेचदा नातेवाईक प्रशासकीय बेजबाबदारपणाचा राग निवासी डॉक्टरांवर काढतात. परिणामी, निवासी डॉक्टरांचा आत्मविश्वास खचतो. या सर्व परिस्थितीवर तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केले.
हेल्पलाईनने मदत मिळते का?
मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयातील पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर पालिकेने निवासी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हेल्पलाईन नंबर चालू केली होती. या हेल्पलाईन नंबरवर मदत मिळते का, असा प्रश्न पालिका वरिष्ठाना विचारा या शब्दांत निवासी डॉक्टरांनी तक्रार केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community