BMC : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ताफ्यात आणखी ३२ कॉम्पॅक्टर

282

मुंबईत दररोज निर्माण होणार ६ हजार २५ मेट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा हा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून उचलला जातो. मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून वाहून नेला जात असून त्यात नव्याने आणखी ३२ कॉम्पॅक्टर वाहने दाखल झाली आहेत. या एका कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून सध्या ६ मेट्रिक टन कचरा नेण्यात येतो. या एकूण ३२ कॉम्पॅक्टर वाहनांपैकी शहरासाठी ६, पश्चिम उपनगरे ११ आणि पूर्व उपनगरासाठी १५ वाहने उपलब्ध झाली आहेत. ठिकठिकाणी साचणाऱ्या या कचऱ्याच्या समस्येवर तत्काळ कार्यवाही करणे शक्य होईल,असे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले.

मुंबई शहर आणि उपनगरात मोठया प्रमाणात घनकचऱ्याच्या तक्रारींचा निपटारा करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. पावसाळ्याच्‍या काळात कचऱ्याची योग्‍यपणे विल्‍हेवाट लावावी, कचरा संकलन व वहन अधिक क्षमतेने करावे, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्‍त आयुक्‍त पी.वेलरासू यांनी सर्व उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यास दिले. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार महानगरपालिकेने मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई व्‍हॉटसऍप हेल्‍पलाईन सुरू केली आहे.

जागच्या जागी समस्येचे निराकरण करण्यासाठी…

मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्‍या कचरा विषयक तक्रारींची नोंद ८१६९६-८१६९७ या हेल्‍पलाईन क्रमांकावर नोंदविली जात आहे. संबंधितांनी छायाचित्र आणि ठिकाण यांची माहिती पाठविल्‍यास तत्‍काळ त्‍याचे निराकरण केले जात आहे. पावसाळ्यात कच-याविषयक समस्‍या उद्भवू शकतात. संभाव्‍य परिस्थिती विचारात घेता सर्व यंत्रणांनी समन्‍वयाने कचरा समस्‍या मार्गी लावावी. अधिक मनुष्‍यबळचा वापर करत, प्रसंगी वाहनांच्‍या फे-या वाढवून कचरा संकलन आणि वाहतूक अधिक क्षमतेने करावी. अधिका-यांनी आपापल्‍या विभागात आकस्मिक भेट देऊन पाहणी करावी. जागच्‍या जागी समस्‍येचे निराकरण करावे, असेही पी. वेलरासू यांनी सांगितले.

(हेही वाचा BMC : कचऱ्याच्या वाढत्या समस्येसाठी महापालिकेने नियुक्त केली सल्लागार कंपनी)

महापालिकेची केवळ २४६ वाहने आणि ठेकेदारांची १६९४ वाहने

सध्या संपूर्ण मुंबई महानगरातील सर्व विभागातून सहा हजार मेट्रिक टन कचरा कांजूर व देवनार क्षेपणभूमी येथे पाठवला जातो. सरासरी ८०० मेट्रिक टन कचरा देवनार क्षेपणभूमी येथे पाठविण्यात येतो. दैनंदिन कचरा, गाळ आणि राडारोडा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण वाहनांमध्ये २४६ महानगरपालिकेची वाहने तर ठेकेदाराची १६९४ वाहने वापरण्यात येतात.

अधिक गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम सेवा देण्याचा मानस

या वाहनांमध्ये नव्या कॉम्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे. दैनंदिन कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी नव्याने ३२ कॉम्पॅक्टर वाहने ताफ्यात दाखल झाल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली. मुंबईतील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अधिक गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम सेवा देण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे यांनी दिली.

चॅटबॉटवरील ५०१८ कचऱ्याच्या तक्रारींचा निपटारा

मुंबईतील स्वच्छतेसाठी निर्देश देताना नागरिकांना कचऱ्याच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी हेल्‍पलाईन उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई व्‍हॉटसऍप हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचा निपटारा महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. व्हॉट्सएप हेल्पलाईनवर जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ५१६२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी घनकचरा विभागाशी संबंधित ५०२३ तक्रारी आल्या होत्या. तक्रारींपैकी ५०१८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर १३९ तक्रारी या कचऱ्याशी संबंधित नव्हत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.