मुंबईत मागील काही दिवसांपासून खड्डयांच्या समस्या वाढू लागल्या असून या खड्डयांची दखल सरकारने घेतल्यानंतर आता प्रशासनाला विभाग कार्यालय आणि त्यांचे सहायक आयुक्त यांची झाल्याचे दिसून येत आहे. सहा मीटर खालील रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी विभागाचे सहायक आयुक्त आणि विभाग कार्यालयावर सोपवण्यात आली हाती, परंतु उर्वरीत सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विविध संस्था नेमण्यात आल्या असून या संस्थांकडून रस्ते विभागाचे अभियंते हे खड्डे भरुन घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे रस्ते विभागाला खड्डे बुजवून घेण्यात आलेल्या अपयशामुळे आता विभाग कार्यालय आणि त्यांचे सहायक आयुक्त यांच्यावर जबाबदारी प्रशासनावर निश्चित करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत मागील काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्डयांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. खड्डयांची ही वाढती समस्या लक्षात घेता उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांची भेट घेऊन हे खड्डे तातडीने बुजवा, हवे असल्यास यासाठी पथक नेमा, पण रस्त्यांवरील खड्डे भरले गेले पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्वरीत सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रत्येक विभागाच्या स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजवण्यासाठीच्या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून कामकाज सांभाळतील, असे जाहीर करून सहायक आयुक्तांवरच याची जबाबदारी सोपवली. विभागस्तरीय रस्ते अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे आपल्या कामाचा पूर्तता अहवाल सादर करतील. दिवसा खड्ड्यांची पाहणी करून रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येईल. विशेष पथके तयार करून खड्डे बुजण्याची कामे युद्ध पातळीवर करण्यात यावी,असे महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
(हेही वाचा राज्यसभेत ‘I.N.D.I.A’ आघाडीत फूट; मणिपूरवर चर्चेसाठी टीएमसी तयार)
मुंबई महापालिकेने पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्डयांची समस्या विचारात घेता विभाग स्तरावर सहा मीटरच्या रस्त्यांची देखभाल करण्याचे निर्देश विभाग कार्यालय आणि त्यांच्या सहायक आयुक्तांना दिले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात कोल्डमिक्स वापरुन सहा मीटर पेक्षा कमी रुंदीचे खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही विभाग कार्यालयांवर सोपवण्यात आली होती. परंतु या व्यतिरिक्त रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, मास्टिक अस्फाल्ट, रिऍक्टीव्ह अस्फाल्ट यांचा वापर करण्यासाठी परिमंडळ तथा विभाग निहाय कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. आजवर रस्ते विभागाच्या माध्यमातूनच खड्डे बुजवण्याची कामे केली जात असताना यामध्ये सहा मीटरच्या खालील रस्ते वगळता अन्य कुठल्याही कामांमध्ये विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सामावून घेतले नाही की कल्पना दिली नाही.
मात्र, पालकमंत्र्यांनी प्रशासनाचे कान टोचल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी रस्ते अभियंत्यांसोबत सर्व पथकं पावसाळ्याच्या काळात प्रत्यक्ष क्षेत्रावर (ऑनफिल्ड) कार्यरत राहतील, याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच या दुय्यम अभियंत्यांच्या देखरेखीखाली मास्टिक रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा वापर करून खड्डे बुजवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आजवर ज्या विभाग कार्यालयाला आणि त्यांच्या सहायक आयुक्तांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विचारात न घेणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांना आता रस्ते विभागातील अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे विभाग कार्यालयांना आणि त्यांच्या सहायक आयुक्तांना त्यात सामावनू घेण्याचा प्रयत्न करावा लागला आहे.
मुंबईमध्ये यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे हे विभाग कार्यालयाच्या माध्यमातून सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बुजवले जात होते. परंतु मागील काही वर्षांपासून रस्ते विभागाच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याच्या कामांसाठी संस्था नियुक्त करून बुजवले जात आहेत. परंतु त्यांना अपयश आल्यानंतर पुन्हा एकदा सहायक आयुक्तांवर याची जबाबदारी सोपवली जाते. याही वर्षी पुन्हा विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांवरच जबाबदारी सोपवण्यात आल्याने आधीपासूनच जर खड्डे बुजवण्याच्या कामांसाठी विभाग कार्यालयांवरच जबाबदारी सोपवली असती तर खड्डयांची समस्या वाढली नसतील,असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community