BMC : अंधेरी सब वेच्या परिसरात का तुंबते पाणी? जाणून घ्या हे कारण

188

मुंबईतील सखल भागांमध्ये अंधेरी सबवे सह अनेक नागरी वस्तीच्या भागात नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केल्यानंतरही पावसाळ्यात अनेकदा अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. प्रत्यक्षात अंधेरी सबवेच्या ठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ३ हजार घनमीटर प्रति तास क्षमतेचे एकूण ६ पंप बसवण्यात आले आहे. तरीही पावसाळ्यात अंधेरी सब वेला प्रथम पाणी तुंबले जाते आणि त्यानंतर पावसाचा निचराही होतो. त्यामुळे एवढी खर्च केल्यानंतरही या सब वेच्या ठिकाणी पाणी का तुंबले जाते असा प्रश्न आजही नागरिकांना पडत आहे.

नाले स्वच्छता आणि रुंदीकरण तसेच खोलीकरण आणि विस्तारिकरणाची कामे महापालिकेच्यावतीने सुरु आहेत.त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये अंधेरी सबवे सह अनेक नागरी वस्तीच्या भागात नागरिकांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, असा दावा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केला होता. पण प्रत्यक्षात अंधेरी सब वेच्या ठिकाणी पावसाळी पाणी तुंबण्याचे प्रकार काही कमी झालेले नाही.

अंधेरी सब वे मार्गे मोगरा नाल्यामधून वाहणारे पाणी मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ मालाड खाडीत वाहून जाते. मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्याने मोठयाप्रमाणात पाऊस पडल्यास आणि त्यावेळेस नाल्यातील पाण्याची पातळी वाढून अंधेरी पश्चिम भागातील अनेक भागांमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण होते.त्यामुळे तीन भागांमध्ये विभागून पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची क्षमता अधिक वाढवण्याची कामे हाती घेतली आहे. या तिन्ही कामांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आलेली असून यावर एकूण १०५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

(हेही वाचा राज्यसभेत ‘I.N.D.I.A’ आघाडीत फूट; मणिपूरवर चर्चेसाठी टीएमसी तयार)

अंधेरी सब वेसह दाऊबाग, आझाद नगर, वि.रा देसाई आदी भागांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीला कारणीभूत असलेल्या मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशन उभारणीच्या कामांना तांत्रिक बाबींमुळे खिळ बसलेली असतानाच आता या नाल्याला जोडणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता अधिक वाढण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रस्ताव मंजुरीनंतरही मोगरा प्रकल्प पुढे सरकेना

महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम प्रस्तावित केले होते. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १३ वर्षांपासून काम रखडले आहे. यासाठी महापालिकेने आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले आहे. त्यानंतर याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १३ ते १४ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही दोन वर्षांहून अधिकचा काळ लागला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खर्च ३३० कोटी रुपयांच्या आसपास केला जात असून दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव मंजूर करूनही या पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होत नाही तोवर अंधेरी सब वेचा परिसर पावसाळ्यात जलमय होण्याच्या समस्येपासून अंधेरी, जोगेश्वरीकरांची सुटका नाही,असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.