Tata Punch iCNG Launched : टाटा पंचची सीएनजी गाडी, काय आहे किंमत?

Tata Punch iCNG Launched : टाटा मोटर्सनी आपल्या मायक्रो एसयुव्ही प्रकारातील लोकप्रिय गाडी टाटा पंचचं सीएनजी मॉडेल बाजारात आणलं आहे. काय आहेत नवीन फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया…

180

टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने शुक्रवारी आपल्या लोकप्रिय टाटा पंच (Tata Punch iCNG) गाडीचं सीएनजी मॉडेल बाजारात आणलं आहे. मायक्रो एसयुव्ही प्रकारातील या गाडीची किंमत 7.1 ते 9.68 लाख रुपयांदरम्यान असणार आहे. आधीच्या सहा रंगांमध्ये ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

टाटा पंच आयसीएनजी गाडीत इतर मॉडेल्स प्रमाणेच ट्विन सिलिंडर तंत्रज्ञान (Twin Cylinder Technology) असेल. पण जोडीलाच आता नवीन सुरक्षा प्रणाली देण्यात आली आहे. त्याचं नाव आहे मायक्रो स्विच. यामुळे गाडीत इंधन भरलं जात असताना गाडीचं इंजिन बंद राहील. हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

याशिवाय थर्मल प्रोटेक्शनमुळे (Thermal Protection) संकटकाळी किंवा टक्कर झाल्यावर गाडीच्या इंजिनला होणारा सीएनजी पुरवठा आपोआप थांबवला जाईल. तसंच गाडीतीच सीएनजी इंधन वातावरणात सोडलं जाईल. यामुळे गाडीचं इंजिन पेट घेणार नाही. टाटा मोटर्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा Maharashtra Session : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन)

आज ही गाडी बाजारात लाँच झाल्याची बातमी येईपर्यंत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये मात्र चढ उतार दिसून आले. आणि निफ्टी आणि सेन्सेक्स या महत्वाच्या निर्देशांकांमध्ये दिवसअखेरीस झालेल्या पडझडीत टाटा मोटर्स कंपनीचे शेअरही खाली आले.

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी टाटा मोटर्सचा शेअर 615 रुपयांवर स्थिर झाला आहे. कालच्या तुलनेत त्यात 3.95 अंशांची किंवा ०.64% इतकी पडझड झाली.

दरम्यान टाटा पंच सीएनजी गाडीच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर नवीन गाडीमध्ये सनरुफची उघडझाप करण्यासाठी आता तुम्ही व्हॉईस कमांडही देऊ शकणार आहात. म्हणजे तुम्ही फक्त ‘सनरुफ ओपन’ किंवा ‘सनरुफ क्लोज’ असं म्हटल्यावर त्या क्रिया पार पडतील.

प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डिस्पे ही अत्याधुनिक पद्धतीचा बसवण्यात आला आहे. गाडीतील म्युझिक आणि व्हीडिओ प्लेअर तुम्ही अँड्रॉईड तसंच ॲॅपल फोनला जोडू शकणार आहात. गाडीचे वायपर पाऊस किंवा पाणी पडल्यावर आपोआप सुरू होतील.

ट्विन सिलिंडर प्रणाली ही टाटा टिएगो आणि टिगॉर या गाड्यांमध्येही बसवल्याचं कंपनीने आजच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. टाटाच्या टिएगो सीएनजी गाडीची किंमत 6.55 लाख ते 8.1 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर टिगॉर गाडीच्या सीएनजीची किंमत 7.8 ते 8.95 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. भारतातील सीएनजी गाड्यांची बाजारपेठ लक्षात घेऊन टाटा मोटर्स कंपनीने आपल्या गाड्‌यांमध्ये हे बदल केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.