भांडुप पश्चिम येथील ड्रिम मॉलला लागलेल्या आगीमध्ये सनराइज कोविड रुग्णालय होरपळले. या दुघर्टनेत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरीत रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढत अन्य रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये दाखल केले. कोविडच्या रुग्णांबाबत लोकांमध्ये एवढी भीती असतानाही अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची तमा न बाळगता त्या रुग्णांना बाहेर काढले. या सर्व जवानांना कोविडच्या दोन लसींचा डोस पूर्ण झाल्याने ही हिंमत आली आहे. मात्र, कोविडची लस घेतल्यानंतरही याचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता या बचाव कार्यात सहभागी झालेल्या सर्व जवान व अधिकाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
आयसीयू विभागाची माहिती नव्हती जवानांना!
भांडुपमधील ड्रिम मॉलच्या लागलेल्या आगीमध्ये एकूण ७६ रुग्णांपैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ७३ रुग्ण हे कोविडचे होते. मॉलमधील आगीचा धूर चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या सनराइज रुग्णालयात पसरला. त्यामुळे जे रुग्ण सर्वसाधारण कक्षात होते, ते जीवाच्या आकांताने धावत बाहेर आले आणि ते गच्चीवर पोहोचले. त्यामुळे या रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या माध्यमातून खाली उतरवले. पण तोपर्यंत जवानांना आयसीयूमधील व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांची कल्पना नव्हती. आगीच्या धुरामुळे या रुग्णांची कल्पना त्यांना आली नाही आणि जेव्हा या रुग्णांपर्यंत जवान बचाव कार्यासाठी पोहोचले, तोपर्यंत या सर्व रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
(हेही वाचा : सनराईस हॉस्पिटल आग : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! भाजपची मागणी!)
सध्या तरी जवान क्वारंटाईन नाहीत!
कोविड रुग्णांच्या आसपास जिथे कुणी जायला तयार नसते, तिथे जीवाची बाजी लावत अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कोविड रुग्णांच्या थेट संपर्कात हे जवान आल्याने भीतीही वर्तवली जात आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवानांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जवानांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे त्या सर्वांना सध्या तरी क्वारंटाईन करण्याची गरज नाही. पण यापैकी दोन चार लोकांना ताप येवू लागला तर सर्वच जवानांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. मात्र, तोपर्यंत सर्वच जवानांकडे विशेष लक्ष देवून त्यांना काही लक्षणे जाणवतात का, याची माहितीही घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community