इमारतीच्या टाक्या साफ करायच्या असतील, तर भाजपच्या नगरसेवकांना भेटा!

ज्या भागांमध्ये भाजपचे नगरसेवक नाहीत, तिथे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विभागातील इमारतींच्या पाण्याच्या टाक्या साफ करून देण्यात येणार आहे.

158

सर्वच राजकीय पक्षांना आता मुंबई महापालिका खुणावत आहे. म्हणूनच महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात भाजपने वेगळीच शक्कल लढवली आहे. पावसाळाच्या आधी सर्व इमारतींच्या कमिटीला पाण्याच्या टाक्या साफ करून घेण्याची चिंता असते, त्यासाठी पैशाची तरतूद करावी लागते, हे त्यामागील खरे दुखणे असते. भाजपने नेमके हेच हेरले आणि मुंबईतील सर्व विभागांतील इमारतीच्या पाण्याच्या टाक्या फुकट साफ करून देण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहचण्याचा मार्ग भाजपने शोधला आहे.

घराघरात पोहचण्याचा प्रयत्न!

आतापासूनच घराघरात पोहचून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी भाजप प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊन डास प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत तसेच दुषित पाण्याची समस्या टाळण्यासाठी पाण्याच्या टाक्या साफ करण्यावर भर देणार आहे. यासाठी भाजपच्या सर्व नगरसेवकांना कार्यरत करण्यात आले आहे. ज्या भागांमध्ये भाजपचे नगरसेवक नाहीत तिथे पदाधिकाऱ्यांना सक्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : सनराईस हॉस्पिटल आग : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! भाजपची मागणी!)

टाक्या साफ करणारी यंत्रे वितरीत करण्यात आली!

जनतेपर्यंत थेट पोहोचता यावे याकरता मुंबई भाजपच्यावतीने ८३ नगरसेवकांना पाण्याच्या टाक्या साफ करणारी यंत्रे वितरीत करण्यात आली आहेत. ज्या कंपनीकडून ही यंत्रे खरेदी करण्यात आली आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून या पाण्याच्या टाक्या साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांना ही यंत्रे प्राप्त होताच आपले दोन कर्मचारी तैनात करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे विभागातील ज्या ज्या सोसायटींकडून पाण्याच्या टाक्या साफ करण्याची मागणी होईल, त्या त्या सोसायट्यांना भाजप नगरसेवकांकडून ही सेवा दिली जाणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही यंत्रे सध्या भाजपच्या नगरसेवकांना वितरीत करून विभागातील सोसायट्यांमधील इमारतींच्या टाक्या साफ स्वच्छ करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आरोग्य सेवा पुरवण्यावर भर!

मुंबईत एकूण २२७ नगरसेवक प्रभाग असून त्यातील ८३ प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक आहे. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या भागांमध्ये भाजपचे नगरसेवक नाहीत तिथे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशी यंत्रे पुरवून विभागातील इमारतींच्या पाण्याच्या टाक्या साफ करण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. तसेच भविष्यात आरोग्य शिबिरही राबवण्याच्या भाजपचा विचार आहे. यामध्ये मुंबईतील प्रत्येक नागरिकांना आरोग्याच्यादृष्टीकोनातून मदत करण्याचा निर्णय मुंबई भाजपने घेतला आहे. त्यामुळे काही विभागांमध्ये अनेक नगरसेवकांनी याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक नगरसेवकांनी दोन कर्मचारी  नेमलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक सोसायट्यांची माहिती असून त्यांना आता पाण्याच्या टाक्या साफ करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.  त्यामुळे सॅनिटाईज करणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून आता पाण्याच्या टाक्याही साफ केल्या जाणार आहेत. त्यांच्याकडून मुंबईतील पाण्याच्या टाक्या शास्त्रोक्तपणे साफ केल्या जाणार आहेत. जर आपल्या इमारतीच्या पाण्याच्या टाक्या साफ करायच्या असतील, तर भाजपच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना संपर्क करा, असे आवाहन भाजपचे नेत्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.