Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी; पोलीस अलर्ट

146

मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईत लोकल रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्यात येईल, अशी धमकी फोनवरून देण्यात आली आहे. तसेच, फोनवरील व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचाही दावा केला. धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करत धमकीचे फोन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव असून तो बिहारचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व रेल्वे स्टेशनवरील पोलिस स्थानकांना सर्तकेची सूचना दिली आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

जुलैमध्येही धमकीचा फोन

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी सकाळी हा धमकीचा फोन आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर धमकी दिली की, मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट होणार आहेत. यावेळी नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याने फोनवरील व्यक्तीकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. फोन करणार्‍याला कोणती ट्रेन, बॉम्ब कुठे ठेवला आहे, असे विचारले असता त्याने कोणतेही उत्तर दिले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते. यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती.

(हेही वाचा Earthquake : चीन भूकंपाने हादरला; १२६ इमारती कोसळल्या)

जुहूमधून केला फोन

दरम्यान, जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून धमकी देणाऱ्याने फोन बंद केला. पोलिसांनी फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलिस ठाण्यांना दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.