Leopard : बिबट्याने नवऱ्याची मान पकडली; वाघीण बनत पत्नी लढली; पतीची सुखरूप सुटका

156
पुण्यातील दौंड तालुक्यातील नानगाव येथे शेतमजुर पतीला पत्नीने बिबट्याच्या तावडीतून सोडवले. या घटनेतून पुराणातील सत्यवानाला सावित्रीने दिलेल्या जीवदानाचा प्रत्यय परिसरातील नागरिकांना आला आहे. काशिनाथ बापू निंबाळकर (वय ५२) यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या पत्नी सरूबाई निंबाळकर (वय ४५) यांनी प्रतिहल्ला करत बिबट्याला परतवून लावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठी नानगाव गावात निंबाळकर राहतात. त्यांच्या घराभोवती ऊस आहे. काशिनाथ निंबाळकर हे रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर आले होते. याचदरम्यान बिबट्याने काशिनाथ यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने निंबाळकर यांची हनुवटी जबड्यात पकडली. अचानक झालेल्या या हल्ल्याने निंबाळकर मोठ्याने ओरडले. त्यांच्या आवाजाने त्यांची पत्नी सरुबाई व त्यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या दिशेने धावून आले. काशिनाथ हे बिबट्याचा प्रतिकार करत असतानाच त्यांच्या कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली आणि सरुबाई यांनी लाकडाने प्रहार करत बिबट्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि काशिनाथ यांना सोडत बिबट्याने उसात धूम ठोकली. या हल्ल्यात निंबाळकर यांच्या हनुवटीला सहा टाके पडले आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर बायकोमुळेच मला जीवदान मिळाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पतीवर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे पाहून अंगाचा थरकाप उडाला होता. पण पतीचा जीव धोक्यात पाहून मागे हटले नाही. हातात लाकूड घेऊन बिबट्यावर हल्ला चढवला आणि पतीला संकटातून सोडवले, अशी प्रतिक्रिया सरुबाई निंबाळकर यांनी दिली.

बिबट्या वयाने लहान असल्याने सुदैवाने निंबाळकर यांची सुटका झाली आहे. घटनेचा पंचनामा केला असून लवकरच आर्थिक मदत केली जाईल. ग्रामपंचायतीचा ठराव आल्यानंतर पिंजरा मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल, अशी माहिती वन अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.