भांडुप पश्चिम येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवार, २५ मार्च रोजी रात्री लागलेल्या आग प्रकरणी ड्रीम मॉल संचालकासह सनराईझ रुग्णालयाच्या संचालक आणि व्यवस्थापकीय मंडळावर भांडुप पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आगीत सनराईझ रुग्णालयातील ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून त्यात ९ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
अद्याप कुणाला अटक नाही!
राकेश कुमार कुलदीपसिंग वाधवान, निकिता अमरसिंह त्रेहान, सारंग राकेश वाधवान, दीपक शिर्के आणि सनराईझ रुग्णालयाचे संचालक आणि व्यवस्थापकीय मंडळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भांडुप पश्चिम येथील ड्रीम मॉलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान या आगीची झळ तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सनराईझ रुग्णालयापर्यंत पोहचली. या रुग्णालयात ७८ रुग्ण उपचार घेत होते, त्यापैकी ११ रुग्णाचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. त्यात दोन महिला आणि ९ पुरुषांचा समावेश आहे. इतर रुग्णांना मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटर आणि इतर रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मॉल चे संचालक मंडळ आणि गाळे धारकांमध्ये वाद
ड्रीम मॉलमध्ये १,१८० गाळे आहेत. ड्रीम मॉल संचालक आणि गाळेधारकामध्ये वाद सुरू असल्याकारणाने ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ कडून प्रशासक नेमण्यात आले आहे. ड्रीम मॉल हा एचडीआयएल कंपनीचा असून राकेश कुमार कुलदीपसिंग वाधवान, निकिता अमरसिंह त्रेहान, सारंग राकेश वाधवान, दीपक शिर्के हे कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. ड्रीम मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असणारे सनराईझ रुग्णालय हे प्रिव्हिलेज हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे असून निकिता त्रेहान, अमितसिंह त्रेहान आणि स्वीटी जैन हे सदर रुग्णालयाच्या संचालक मंडळावर आहेत. जानेवारी २०२१ मध्ये सनराईझ रुग्णालयाला कोविड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली होती.
सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जीपणा केल्याचा आरोप
या रुग्णालयाचे मालक निकिता त्रेहान आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुथ्थु शेरी हे आहेत. या मॉलचे संचालक, प्रशासकीय अधिकारी, रुग्णालयाचे संचालक आणि व्यस्थापकीय मंडळ यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीही उपाययोजना केली नाही, सुरक्षेच्या अटी व शर्तीचे पालन न करता खबरदारी घेतली नाही, तसेच अग्नीसुरक्षा कार्यन्वित आहे का, याची जाणूनबुजून खबरदारी घेतली नाही आणि ११ जणांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचे दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०४( सदोष मनुष्यवध) ३४(सह) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community