- ऋजुता लुकतुके
क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानी संघ सहभागी होणार की नाही, याविषयीची अनिश्चितला संपुष्टात आली आहे. राजकारण वेगळं आणि खेळ वेगळा म्हणत पाक सरकारने क्रिकेट संघाला दिली भारतात खेळायला परवानगी. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे राजकीय संबंध सध्या ताणलेले आहेत. आणि २०१९ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान संघाने भारतीय दौरा केलेला नाही. तर आशिया चषकासाठी भारतीय संघाला पाकिस्तानला जाण्यासाठी भारत सरकारने परवानगी नाकारल्यानंतर तर पाकिस्तान सरकारनेही विश्वचषकासाठी आडमुठं धोरण ठेवलं.
आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही तर विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारतात पाठवणार नाही अशी पाक सरकारची भूमिका होती. पण, अखेर रविवारी पाक सरकारने संघाला भारतात पाठवण्यासाठी परवानगी दिली आहे. आशिया चषकावर अलीकडेच तोडगा निघाला होता. आणि भारत, पाकिस्तान दरम्यानचा सामना श्रीलंकेच्या पलिक्कल इथं खेळवण्याचं ठरलं. ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका इथं आशिया कप संयुक्तपणे भरणार आहे. इथं तोडगा निघाल्यानंतर एकदिवशीय विश्वचषकासाठी पाकिस्तान सरकारने आपला विरोध मागे घेतल्याचं दिसतंय.
रविवारी एक पत्रक काढून पाक सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘देशांमधील द्विपक्षीय संबंध ताणलेले असले तरी त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रमावर व्हावा असं आम्हाला वाटत नाही,’ असं पत्रकात म्हटलं आहे. त्याचवेळी पाक संघाच्या सुरक्षेविषयीही काळजी व्यक्त करण्यात आली आहे. ‘आयसीसी आणि भारतीय क्रिकेट मंडळाबरोबर त्याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत,’ असं पाक सरकारने स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचा – मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडणार!; ई-रजिस्ट्रेशन महागणार, ‘हे’ आहेत नवे शुल्क)
‘पाक संघाच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी आम्हाला हवी आहे. बाकी आम्ही घेतलेला निर्णय हा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय जबाबदारीला धरून घेतला आहे,’ असं पत्रकात म्हटलं आहे. दर चार वर्षांनी होणारा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. आधी ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२३ दरम्यान होणार होती. पण, कोविड उद्रेकामुळे स्पर्धेपूर्वीची पात्रता प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही.
जेमतेम जुलै महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि स्पर्धेत खेळणारे दहा संघ निश्चित झाले आहेत. यजमान देश भारताबरोबरच पाकिस्तान, द आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ आयसीसी सुपर लीगमध्ये मोडतात. तर झिंबाब्वे, श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांनी पात्रता स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे एकेकाळचा बलाढ्य वेस्ट इंडिज मात्र यंदा स्पर्धेसाठी पात्रही ठरलेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community