कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर सुरु केला आहे. यात आता लोकप्रतिनिधींसह आता क्रीडा क्षेत्रातीलही प्रतिष्ठित व्यक्ती या कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. शनिवारी, २७ मार्च रोजी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली, तशी माहिती त्याने स्वतः ट्विट करू दिली.
घरातच स्वतःचे केले विलगीकरण!
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाली आहे. सचिनने टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सचिन घरातच विलगीकरणात आहे. सचिन तेंडुलकरचे कुटुंब सुरक्षित आहे. सचिन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर संपूर्ण कुटूंबाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
सचिनच्या घरातील सगळे सुरक्षित!
मी सतत चाचण्या करत आलो आहे. तसेच नेहमी कोरोना टाळण्यासाठी सर्व पावले उचलली. तथापि, मी कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. घरातील इतर सदस्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. मी सध्या होमआयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सूचना पाळत असून मला साथ देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्याचे आभार, असे टि्वट सचिनने केले आहे.
(हेही वाचा : राज्यभरात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी!)
कोरोना चाचणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता!
नुकतेच सचिन तेंडुलकर सोशल मीडियात कोरोनाची टेस्ट करताना प्रॅन्क व्हिडीओ व्हायरल केला होता. ज्यामध्ये नाकातील द्रव स्वरूप नमुना बाहेर काढताना प्रचंड वेदना झाल्याचे नाटक करत ओरडला होता आणि नंतर हा विनोद केल्याचे त्याने म्हटले होते. त्यामाध्यमातून त्याने कोरोनाची चाचणी करा, असा संदेश दिला होता.
क्रीडापटूंना कोरोनाची लागण!
या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण झाली होती. सुनीलने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. याआधी पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत अनेक स्टार क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाली आहे.
Join Our WhatsApp Community