गुरुवार, २५ मार्च रोजी मुंबईत ड्रीम मॉलला भीषण आग लागली, त्याच मॉलमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयातील १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, या घटनेला २४ तास होत नाही तोच शुक्रवारी, २६ मार्च रोजी रात्री उशिरा पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटला भीषण आग लागली. ही आग रात्रीच आटोक्यात आणल्यानंतर घरी परतत असताना एका कर्तव्यदक्ष अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. प्रकाश हसबे असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे प्रमुख होते.
पुण्याच्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास पूर्णपणे आटोक्यात आली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन झाल्यानंतर प्रकाश हसबे हे घरी जाण्यास निघाले. पहाटे घरी जात असताना येरवाड्याजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील आग आटोक्यात!
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल तीन तासांनी ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल ४०० दुकाने जाळून खाक झाली. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या भाग कॅन्टोन्मेंट झोनमध्ये येतो. काही दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने या भागाचे फायर ऑडिट केले होते. त्यावेळी त्यांना आगीच्या संदर्भात चेतावणी दिली होती. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाने येथील दुकानदारांवर कारवाई देखील केली होती. मात्र त्याच दरम्यान येथील दुकानदार न्यायालयात गेले आणि त्यांच्यावरील कारवाई थांबली.
कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट परिसरात लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या पुणे महानगरपालिकेचे विविध फायर स्टेशनचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीनं कमी वेळातच रौद्र रूप धारण केले असले तरी रहिवासी परिसर खाली केला जात आहे.#PuneFire pic.twitter.com/5GswzTU5a0
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 26, 2021
कोणतीही जीवितहानी नाही
फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकाने, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
(हेही वाचा : सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण!)
Join Our WhatsApp Community