गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केले असून त्यावर सभागृहात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि ‘इंडिया’तील घटक पक्षांदरम्यान शाब्दीक खडाजंगी बघायला मिळत आहे. दिल्ली सेवा विधेयकावर कॉग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांनी चर्चेला सुरवात करीत भाजप सरकारवर ताशेरे ओढले होते. परंतु, यानंतर भाजपचे डॉ. सुधांशु त्रिवेदी यांनी बोलायला सुरुवात केली आणि कॉंग्रेससह आम आदमी पक्षाचा चांगला समाचार घेतला. त्रिवेदी यांनी ‘इन्हें न पढ़ाई से मतलब है और न लिखाई से मतलब है। इन्हें तो सिर्फ कमाई से मतलब है’ हा शेर बोलून आपचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला.
त्रिवेदी यांनी काॅंग्रेस आणि आपच्या मैत्रीचेही पितळ उघडे पाडले. ते म्हणाले की, या विधेयकावर कॉग्रेसचा पाठिंबा मिळवून आपण आघाडी घेतली असा आम आदमी पक्षाचा समज झाला आहे. परंतु, अविश्वास प्रस्ताव आणून कॉग्रेसने आधीच आपला साईडलाईन केले आहे. यावर सुधांशू त्रिवेदी यांनी आणखी एक शेर ऐकविला आणि सभागृहात एकच हशा पिकला. ‘न तुम आए, न तुम्हारी दीद हुई, तुम ही बताओ यह मुहर्रम हुई कि ईद हुई’ या शायरीने वेगळेच वातावरण तयार केले.
सुधांशू त्रिवेदी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 2013 मध्ये सीएम अरविंद केजरीवाल यांनी केलेले ट्विट आहे. या ट्वीटमध्ये केजरीवाल म्हणतात की, ‘सीएम शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी 10 एअर कंडिशनर आहेत. एवढेच काय तर बाथरूममध्येही एसी लागला आहे. याचे वीज बिल कोण भरते? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. आज केजरीवाल यांच्या घरात 15 बाथरूम आहेत आणि त्यामध्ये 1 कोटी रुपयांचे पडदे लावण्यात आले आहेत. ‘मी घर घेणार नाही. गाडी घेणार नाही. कोणतीही सुरक्षा घेणार नाही’ अशाप्रकारचे कितीतरी दावे करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या घरी एक कोटीचे पडदे लावले आहेत, असा घणाघातही सुधांशू त्रिवेदी यांनी केला.
Join Our WhatsApp Community