जून महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली, तर जुलै महिन्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. त्यात आता ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा देखील संपला आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी पाण्याचे प्रकल्प आता कोरडे पडू लागले आहे. तर काही ठिकाणी धरणात अल्प पाणीसाठा (Water Storage) शिल्लक असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात (Marathwada) देखील आता परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. कारण विभागातील 11 मोठ्या धरणात फक्त 42 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता फक्त दोन महिने पावसाळा शिल्लक राहिला आहे. चिंताजनक म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी (Jayakwadi) धरणात फक्त 33.18 टक्के पाणीसाठा राहिला आहे.
पिकं मान टाकू लागले
जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर मागील सात दिवसांत किंचित भाग सोडल्यास मराठवाड्यात चांगला पाऊसच झाला नाही. काही ठिकाणी तर मागील सात दिवसांत पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी तर पिके अक्षरशः माना टाकू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आधीच सव्वादोन महिने पावसाचे संपले असल्याने दुबार पेरणी करूनही काही हातात येईल याची देखील अपेक्षा कमीच आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.