Meri Mati, Mera Desh : ‘मेरी माटी, मेरा देश’; होणार सन्मान शूरवीरांचा …

‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहिम दि. ९ ऑगस्ट रोजी सुरू होईल

1541
Meri Mati, Mera Desh : 'मेरी माटी, मेरा देश'; होणार सन्मान शूरवीरांचा …
Meri Mati, Mera Desh : 'मेरी माटी, मेरा देश'; होणार सन्मान शूरवीरांचा …

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहिम दि. ९ ऑगस्ट रोजी सुरू होईल. दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर दि. १६ ऑगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका, नगरपरिषद आणि राज्यस्तरावर होणार आहेत. दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे समारोप होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. ग्रामस्तरापासून राष्ट्रीयस्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये शहिदांचे नाव असणारे शिलाफलक बसवण्यात येणार आहेत. तर, दिल्ली येथे निर्मित होणाऱ्या अमृत वाटिकेसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातून माती आणली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेत शूरवीरांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रम आयोजिले आहे. शूरविरांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील ८७ अमृत सरोवराजवळ शिलाफलक उभारले जातील. तसेच अमृत सरोवराच्या परिसरात प्रत्येकी ७५ याप्रमाणे ६ हजार ५२५ भारतीय प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाला ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

दिल्ली येथे ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामस्तरावरून पंचायत स्तवरावर माती गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन जिल्हास्तरावर एकत्रित केल्या जाईल. त्यानंतर शहिदांच्या कुटुंबियांच्या हस्ते दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमासाठी अमृत कलश रवाना करण्यात येणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असेल. या मोहिमेत लोकसहभागाला विशेष महत्व देण्यात आले आहे. लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – अठरा वर्षांखालील अल्पवयीनांना इंस्टाग्राम वापरण्यावर बंदी?, काय सांगतो सरकारचा नवीन नियम?)

या कृतीतून लोक भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे, यावर लक्ष केंद्रित करून पंच प्राणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या सहभागामुळे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी झाला. या वर्षी देखील दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवावेत आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या देशव्यापी मोहिमेचा तपशील yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे. पोर्टलवर ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती देण्यात आली आहे. तरूणांनी या वेबसाइटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रम अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. युवक-युवतींनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे, तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.