- ऋजुता लुकतुके
चीनच्या निर्यातीत २०२० नंतरची सगळ्यात मोठी घट दिसून आली आहे. चायनीज सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार निर्यात १४.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. कोरोना उद्रेकाचा चायनीज अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं आपण ऐकून होतो. आता त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागले आहेत. चीनने आज (८ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत व्यापाराचे आकडे जाहीर केले. आणि यात देशाची निर्यात गेल्यावर्षी याच कालावधीच्या तुलनेत तब्बल १४.५ टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसत आहे. तर चीनकडून होणारी आयातही साधारण १३ टक्क्यांनी कमी झाली आहे.
जागतिक तसंच देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे ही वेळ ओढावल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे. प्रत्यक्ष कोरोना काळात २०२० मध्ये चीनने निर्यातीचा नीच्चांक नोंदवला होता. त्यानंतर पहिलांदाच ही घट दोन आकडी आहे. हे आकडे अमेरिकन डॉलरमधील आहेत. ताज्या आकड्यांचा खोलात जाऊन विचार केला तर चीन अमेरिकेला करत असलेली निर्यात २३ टक्क्यांनी कमी झाली आहे तर युरोपीयन महासंघात करत असलेली निर्यात २० टक्क्यांनी कमी झाली आहे. आशियाई देशांमधील निर्यातीतही २१ टक्क्यांची घट झाली आहे. आताच्या रशिया-युक्रेन युद्धात चीन रशियाच्या बाजूने आहे. म्हणजे तशी थेट भूमिका त्यांनी घेतली नसली तरी ते रशियाला शस्त्रास्त्रांची मदत करत आहेत. अशावेळी रशियाकडून चीन करत असलेली आयातही ८ टक्क्यांनी कमी झाली आहे.
(हेही वाचा – मुलुंड कोविड हॉस्पिटलच्या आडून १०० कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा आरोप)
चीन हा जागतिक वस्तू, अन्न व सेवा पुरवठा साखळीतला एक महत्त्वाचा देश आहे. जगासाठी उत्पादनाचा कारखाना अशीच या देशाची ओळख आहे. पण, कोरोनानंतर अमेरिकेतली ढासळती अर्थव्यवस्था आणि चीनमध्येही खालावलेली परिस्थिती यामुळे मागणी कमी झाली आहे. खुद्द चीनमध्ये कच्च्या तेलाची आवक जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.८ टक्क्यांनी कमी होती. हा आकडा देशातील घटलेलं उत्पादन आणि घटलेली मागणी दर्शवण्यासाठी पुरेसा बोलका आहे. चीनमध्ये खाद्यतेल, चारचाकी गाड्या तसंच सुटकेसेस अशा गोष्टींना या कालावधीत तुलनेनं जास्त मागणी होती. तर निर्यातीत चीनने कागदी लगदा, वनस्पती तेल आणि कोळसा उत्पादनांची सर्वाधिक निर्यात केली. निर्यात हा चायनीज अर्थव्यवस्थेचा पाया आहे. त्यामुळे व्यापारातील ही घट देशासाठी नुकसानकारक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community