Uddhav Thackeray : ‘राज ठाकरेंशी युती करूया’ म्हटल्यावर काय म्हणालेले उद्धव ठाकरे?

147

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि मनसे पक्षाची युती होऊ शकते असं बोललं जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत या युतीबद्दलही चर्चा होऊ शकते असं म्हटलं जात आहे. अशातच ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिरसाट म्हणाले, आम्ही २०१४ ला (शिवसेना पक्ष एकसंघ असताना) मनसेशी युती करण्याबाबत विचारणा केली होती. परंतु, तेव्हा ते (उद्धव ठाकरे) आम्हाला म्हणाले, का बोलायचं? कशासाठी बोलायचं? ज्यांना तिकडे जायचंय ते जाऊ शकतात.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र येणं आनंदाची गोष्ट आहे. परंतु स्वतःचं काही द्यायचं नाही, ही जी त्यांची (ठाकरे गट) वृत्ती आहे, त्यामुळे दोन पक्ष एकत्र येतील असं मला वाटत नाही. राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. ते खूप दिलदार आहेत. ते एखाद्या वेळी असा निर्णय घेऊ शकतात. परंतु, यांच्या बाजूचे (उद्धव ठाकरे यांच्या बाजूचे) बगलबच्चे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत.

(हेही वाचा No Confidence Motion : श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; UPA काळातील भ्रष्टाचारांची वाचून दाखवली यादी )

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, आम्ही स्वतः शिवसेना मनसे युतीबद्दल बोलायचो. २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपा युती नव्हती, तेव्हा आम्ही बोललो होतो. आपली भाजपाबरोबर युती होत नाहीये ना, मग आपण राज ठाकरे यांच्याशी बोलायला हवं. पण नाही, ते (ठाकरे गटातील वरिष्ठ) म्हणाले, का बोलायचं? कशासाठी बोलायचं? ज्यांना तिकडे जायचं आहे ते जाऊ शकतात. हे त्यांचं ठरलेलं वाक्य आहे. ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात. त्यामुळे कधी जवळीक निर्माण झाली नाही.

संजय शिरसाट म्हणाले, आजची परिस्थिती कशीही असो, राज ठाकरे गेल्या १४ वर्षांपासून त्यांचा पक्ष चालवत आहेत. त्यांच्या ताकदीने ते पक्ष चालवत आहेत. त्यांनाही बराच त्रास दिला गेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही, प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही… राज ठाकरे त्यांना झालेला त्रास विसरणार नाहीत. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेची युती होईल असं मला वाटत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.