सेनेचा ‘वाघ’ अडचणीत, भेदणार का चक्रव्यूह?

शिवसेनेशी असलेली जवळीक यामुळे सचिन वाझे यांना 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा पोलीस दलाच्या सेवेत सामावून घेण्यात आले. वाझेंना पोलीस दलात नुसते आणले नाही, तर त्यांच्यावर क्राईम इंटेलिजेन्सची जबाबदारी देखील देण्यात आली. पण इतकी मोठी जबाबदारी दिलेले वाझे आपल्याला इतक्या मोठ्या अडचणीत आणतील याचा अंदाज ना उद्धव ठाकरेंना होता ना त्यांच्या पक्षाला. वाझेंमुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. 

132

सचिन वाझे…नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’. वाझे हे १९९०च्या बॅचचे अधिकारी. ६०हून अधिक एन्काऊंटर वाझेंनी केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना, त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केले होते. मात्र आता हेच वाझे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुसते चर्चेतच नाही, तर त्यांच्यामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी देखील वाढली आहे. राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर १६ वर्षे निलंबित राहिलेले सचिन वाझे यांना पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ आले. होय! अच्छे दिनच म्हणावे लागेल. राज्यात ठाकरे सरकार येताच वाझे पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाले. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील सचिन वाझेंना पुन्हा सेवेत आणण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले.

…आणि वाझे आले अडचणीत!

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घरातून उचलून आणल्यानंतर पुन्हा एकदा वाझे माध्यमांच्या चर्चेचा विषय बनले. अर्णबला उचलून मोठ्या थाटात वावरणाऱ्या वाझेंचे वासे असे काही फिरले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात थेट त्यांना अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे प्रकरणही तितकेच गंभीर आहे. राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू असतानाच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली जी स्कॉर्पियो गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर विधानसभेत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा लावून धरत या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ही केस एनआयएकडे सोपवली जावी, अशी मागणी विधिमंडळात लावून धरली. या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार क्राईम ब्रांचचे सचिन वाझे यांच्या नावाचा देखील उल्लेख आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेला अडचणीत आणण्याची ही खेळी भाजपने आखली. मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटमध्ये कुणाला भेटले, हे जाणून घेण्यात यावे, मनसुख हिरेन यांचे सचिन वाझे यांच्याशी आधीपासून संबंध होते, तसे सीडीआर रिपोर्ट असल्याचे एक ना अनेक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी थेट सभागृहात केले. एवढेच नाही तर मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथेही सचिन वाझेच सर्वात आधी कसे पोहोचले, असा आरोप करत सचिन वाझे यांना तत्काळ अटक करत हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. यावेळी गृहमंत्र्यांनी हे प्रकरण एटीएसकडे सोपवले. मात्र या प्रकरणाच्या तपासणीत केंद्रीय तपास यंत्रणेने एन्ट्री केली आणि त्यानंतर केंद्रीय तपास पथकाकडून एका पाठोपाठ एक खुलासे बाहेर येऊ लागल्याने ठाकरे सरकारची पुरती दाणादाण उडाली.

(हेही वाचा : बुडत्याचा पाय आणखी खोलात… वाझेचे वाजले की बारा!)

महाआघाडीत फक्त शिवसेनेची बदनामी!

या प्रकरणाकडे जर बारकाईने पाहिले, तर यामध्ये सर्वाधिक बदनामी होत आहे, ती शिवसेनेची. हे प्रकरण आता इतके चिघळले आहे की, खुद्द शरद पवार यांना देखील लक्ष घालावे लागत आहेत. ते यामध्ये लक्ष घालत आहेत की त्यांच्या डोक्यामध्ये दुसरे काही चालले आहे, हा मात्र चर्चेचा विषय असू शकतो. पण शरद पवार यांनी दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरू ठेवले. कधी ते शिवसेना खासदार संजय राऊत, कधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भेटण्यासाठी बोलवत, तर कधी गृहमंत्र्यांना. मात्र या सगळ्यात काँग्रेस मात्र नामानिराळी राहिलेली आहे. ‘सध्या जे चालले आहे ते फक्त बघायचे आणि शिवसेनेच्या बदनामीची मज्जा घ्यायची’, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मागील वर्षभराचा विचार केला, तर महाविकास आघाडीत ‘बदनाम हुई तो शिवसेना’, असे म्हणण्याची वेळ शिवसैनिकांवर आली आहे. जे सुरू आहे ते फक्त उघड्या डोळ्यांनी मुकाटपणे बघायचे अशी भावना जुनेजाणते शिवसैनिक खासगीत बोलून दाखवत आहेत. मागील वर्षभरातील प्रकरणे पाहिली, तर नुकतेच समोर आलेल्या पूजा चव्हाण प्रकरणामुळे शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपद सोडावे लागले. तर सुशांतसिंह राजपूत प्रकरण आणि दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणात एका युवा मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप थेट राणे कुटुंबाने केला होता. आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाईला सचिन वाझेंना फोन करण्याचा अधिकार कुणी दिला? आपल्या नातेवाईकाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री सचिन वाझेला पाठीशी घालत आहेत का? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण तपासण्याची मागणी केली होती. वरुण सरदेसाई यांच्या कॉलचे सीडीआर एनआयएने तपासावे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. त्यानंतर जरी वरुण सरदेसाई यांनी आपण नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याची भाषा केली असली तरी देखील उद्धव ठाकरेंचे नातेवाईक असलेल्या वरून सरदेसाई यांचे नाव घेतल्याने शिवसेनेची देखील डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. आज वाझे प्रकरणावरून जरी मुंबई पोलीस आयुक्त ठाकरे सरकारने बदलले असले तरी हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे असल्याने ठाकरे सरकारची डोकेदुखी भविष्यात आणखी वाढू शकते. एकीकडे ‘आगे आगे देखो होता है क्या’, म्हणणारी भाजप समोर असल्याने दुसरीकडे वाझेंचे प्रकरण ठाकरे सरकारच्या मानगुटीवर असणार आहे. त्यामुळे चक्रव्युहात अडकलेला ‘वाघ’ चक्रव्यूह भेदून कसा बाहेर पडणार आणि राज्याचा कारभार हाकणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.