सायन येथील मुंबई महानगरपालिकेच्या टिळक रुग्णालयात लवकरच वंध्यत्व निवारण उपचारही उपलब्ध केले जाणार असल्याची घोषणा सायन रुग्णालय प्रशासनाने केली. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाकडून वंध्यत्व निवारणासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरु केला जाईल. त्यापाठोपाठ वंध्यत्व निवारण केंद्राचीही स्थापना केली जाईल, अशी माहिती दिली गेली. भविष्यात टेस्ट ट्यूब बेबी केंद्रही सुरु केले जाईल.
याआधीही वंध्यत्व निवारणासाठी तपासण्या, निदान आणि उपचार दिले जायचे. मात्र, रुग्णालयात याकरिता विशेष बाह्य रुग्ण विभाग नव्हता. वाढत्या वंध्यत्वाच्या समस्येवरून विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याचा विचार रुग्णालय प्रशासनाने केला. उपचाराअंती ८० टक्के रुग्णांची वंध्यत्वाची समस्या दूर झाली. त्यामुळे विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय पक्का झाला. या केंद्रासाठी होनररी डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहे. आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. केदार गाणला या विशेष बाह्य रुग्ण सेवा विभागाचे काम पाहतील. बाह्य रुग्ण विभागात रुग्णांच्या निदान तपासणीची सोय असेल.
रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अर्चना भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंध्यत्व निवारण विशेष बाह्यरुग्ण विभाग दर मंगळवारी आणि शुक्रवारी सुरु ठेवला जाईल. सकाळी १० ते बारा दरम्यान रुग्ण तपासले जातील. पहिल्या टप्प्यात महिलेच्या गर्भाशयात जोडीदाराचे सीमेन सोडण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
(हेही वाचा – Wheat : तांदळानंतर आता गव्हाची दरवाढ; किंमती सहा महिन्यांच्या उच्चांकावर)
लवकरच टेस्ट ट्युब बेबी केंद्र
वंध्यत्व उपचार विशेष बाह्य रुग्ण विभागापाठोपाठ आता रुग्णालय टेस्ट ट्यूब बेबी केंद्रही सुरु करण्याच्या विचारात आहे. धारावी येथील छोटा सायन रुग्णालयात टेस्ट ट्यूब बेबी केंद्र उभारण्याचा रुग्णालय प्रशासनाचा विचार सुरु आहे. साधारणत चार ते पाच सायकलनंतर महिला गर्भवती राहते. याकरिता खासगी रुग्णालयात चार ते पाच लाखांचा खर्च येतो.
सायन रुग्णालयात यासाठी केवळ ४० ते ५० हजार रुपये आकारले जातील. सायन रुग्णालयात लवकरच वंध्यत्व निवारण विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरु होत आहे. रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सायन रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील राहील.
डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय
हेही पहा –
Join Our WhatsApp Community