ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक हरी नरके यांचे निधन झाले. त्यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.
हरी रामचंद्र नरके असे त्यांचे पूर्ण नाव असून एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी त्यांची ओळख होती. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
(हेही वाचा – ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच गेस्ट्रॉऐवजी मलेरियाने डोके काढले वर)
दोन पुस्तकेही प्रसिद्ध –
प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तकांचा समावेश आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नेमके काय बोलले मुख्यमंत्री शिंदे?
‘महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) यांनी आपली अशी ओळख निर्माण केली. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन याचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास-संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
“ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरीरीनं मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community