जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र पूर परिस्थिती येईपर्यंत पाऊस झाला. आता ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाला फारसे पोषक वातावरण नसल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. ऐन एल निनोच्या सावटात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकत आहेत. एल निनो कितपत विकसित झाला आहे, याबाबत अद्यापही ठोस माहिती कोणत्याही जागतिक तसेच भारतीय वेधशाळेने दिली नसल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले.
प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाण्याच्या प्रवाहाला एल निनो असे संबोधले जाते. या स्थितीत भारतीय नैऋत्य मोसमी वाऱ्यांमधील बाष्प प्रशांत महासागरातील एल निनो खेचतो. परिणामी भारतात पाऊस कमी होतो. यंदा संपूर्ण देशात सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात देशात २६३.७ मिमी पाऊस झाला होता. सरासरीच्या तुलनेत गेल्या वर्षीचा पाऊस तुलनेने ३ टक्के जास्त होता.
यंदा मात्र पाऊस देशभरात ऑगस्ट महिन्यातील सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे, असाही अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. राज्यात ५४४.५ मिमी पाऊस दरवर्षाला अपेक्षित आहे मात्र, प्रत्यक्षात ६१२.९ मिमी पाऊस झाला. राज्यात यंदा १३ टक्के अधिक पाऊस झाला असला तरीही ऑगस्ट महिन्याची सरासरी पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा – ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके कालवश; पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला)
कमी पावसाचे जिल्हे –
छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात फारच कमी पाऊस झाला आहे.
शनिवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता –
राज्यात सध्या संततधार पावसाची सुतराम शक्यता नाही. शनिवारपर्यंत राज्याला हलक्या सरींसाठी ग्रीन अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जारी केला आहे. ग्रीन अलर्ट जारी केल्यास हवामानाचा पूर्वानुमान खरा ठरण्याची शक्यता कमीच असते.
देशात ९४ टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची भीती –
देशात ऑगस्ट महिन्यातील पावसाचा तुटवडा पाहता यंदा ९४ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community