बाली हा इंडोनेशिया देशाचा भाग असून सुंदा बेटांच्या पश्चिमेकडे स्थित आहे. जावा प्रांताच्या पूर्वेस आणि लोम्बोक प्रांताच्या पश्चिमेस बाली हे बेट आणि शेजारची काही छोटी बेटे, विशेषतः नुसा पेनिडा, नुसा लेम्बोंगन आणि नुसा सेनिंगन वसलेली आहेत. डेन्पासार हे बालीचे राजधानीचे शहर आहे. बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ असून बालीची ८० टक्के अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.
हिंदूबहुल प्रांत!
बाली हा इंडोनेशियातील एकमेव हिंदूबहुल प्रांत असून ८२.५ टक्के लोक हिंदू धर्माचे पालन करतात. पारंपरिक आणि आधुनिक नृत्य, शिल्पकला, चित्रकला, चर्मोद्योग, धातूकार्य आणि अशा अनेक कलांसाठी बाली प्रसिद्ध आहे. अशा ह्या हिंदू संस्कृती समृद्ध असलेल्या बालीमध्ये गलुंगान आणि कुनिंगान हा महोत्सव, आपल्या देशातील दिवाळीप्रमाणे, अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. बलिनीज कॅलेंडरनुसार दर २१० दिवसांनी हा सण साजरा केला जातो. गलुंगान हा शब्द जावानीस भाषेतूनआला आहे, ज्याचा अर्थ ‘प्रचलित’ असा होतो. गलुंगान उत्सवाचा आणखी एक अर्थ आहे, जो विश्वाच्या निर्मितीचे आणि त्यातील सर्व साहित्याचे आणि रचनांचे स्मरण करणे.
(हेही वाचा : सिगिरिया- श्रीलंकेचा पहारेदार!)
पूर्वजांचे आत्मे येतात पृथ्वीवर!
गलुंगान हा सण म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय. ह्या निमित्ताने पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात. हे आत्मे आपल्या पूर्वीच्या घरी येणार म्हणून त्यांचेआदरातिथ्य करण्याची जबाबदारी घरातील माणसांवर असते. उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे कुनिंगान, या दिवशी हे आत्मे पृथ्वीवरून बाहेर पडतात. उत्सवाची सर्वात महत्वाची कलाकृती म्हणजे पेंजोर. पेंजोर म्हणजे बांबूचे आकर्षक सजावट केलेले खांब आणि त्या खांबांखाली ठेवलेला प्रसाद. हे घरांच्या बाहेर रस्त्यालगत उभे केलेले पेंजोर बालीचे सौंदर्य अधिक वाढवतात. या दिवशी हिंदू लोक पारंपरिक पोषाख करून आपापल्या परिसरातील मंदिरांमध्ये जातात. विशेषतः स्त्रिया डोक्यावरून फुले आणि प्रसाद घेऊन मंदिरात जातात. ज्या हिंदूंचे कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडले आहेत, त्यांच्यासाठी फुले आणि प्रसाद अर्पण केला जातो.
१४ ते २४ एप्रिलपर्यंत साजरा होतो गलुंगान आणि कुनिंगान!
गलुंगान दिनाच्या बरोबर १० दिवसांनंतर कुनिंगान दिन साजरा केला जातो. कुनिंगान हा शब्द ‘कौनिंगन’ या शब्दापासून आला आहे. ज्याचा शब्दशः अर्थ आत्मचिंतनाने देवाच्या जवळ जाणे असा होतो. त्यामुळे आपल्या जीवनातील धोकादायक गोष्टींपासून आपण नेहमीच सुरक्षित राहतो. कुनिंगान उत्सवाचा अर्थ असा होतो की, माणूस या नात्याने आपण स्वतःला, निसर्गाला आणि देवाला नेहमी धर्म (चांगुलपणा) जिंकून अधर्माचा(दुष्ट) पराभव करण्याचे वचन देतो. बालीमधील हिंदूंचे असे मत आहे की, कुनिंगान दिनी दुपारी १२ वाजता पूजा प्रक्रिया करावी, कारण विश्वाची ऊर्जा सकाळपासून चढते आणि दुपारी शिखरावर पोहोचते. गलुंगान आणि कुनिंगान यांचा अधर्माविरुद्ध धर्म विजय असाअर्थ लावणे हे शारीरिक लढाईच्या परिस्थितीत असण्याची गरज नाही. इथल्या विजयाचा अर्थ मनाच्या सर्व अराजकाविरुद्ध तसेच स्वत:मधील स्वार्थ आणि दुष्टाईविरुद्ध लढणे असा होतो. स्पष्ट मन आणि विश्वास मिळवण्यासाठीआध्यात्मिक शक्तीला एकत्र आणणे म्हणजे अहंकारापासून दूर जाण्याचा प्रयत्न गलुंगन आणि कुनिंगनच्या निमित्ताने केला जातो. असा हा गलुंगान १४ एप्रिल रोजी सुरु होईल आणि १० दिवसांनी म्हणजे २४ एप्रिल रोजी कुनिंगानने ह्या महोत्सवाची सांगता होईल.
Join Our WhatsApp Community