रत्नागिरी जिल्ह्याच्या बारसू गावात प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणा—या संघटनेच्या पदाधिका—यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. तर, कोकणवासीयांना हा प्रकल्प नको असेल तर केंद्र सरकारकडून तो लादला जाणार नाही, असे आश्वासन पुरी यांनी संघटनेला दिले असल्याचे खासदार विनायक राउत यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राउत यांच्या अध्यक्षतेखाली बारसू रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिका—यांनी काल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात अमोल बोळे, वैभव कोळवणकर, नरेंद्र जोशी, कमलाकर गुरव, शंकर जोशी, सत्यजीत चव्हाण आणि नितीन जठार यांचा समावेश होता.
(हेही वाचा Rahul Gandhi : संसदेत राहुल गांधींचं असभ्य वर्तन; सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप)
याबाबत पत्रकारांना माहिती देताना राऊत यांनी सांगितले की, कोकणातील लोकांना रिफायनरी प्रकल्प नको आहे. राज्य सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यास स्थानिकांचा विरोध आहे आणि काहीही झाले तरी हा प्रकल्प होवू दिला जाणार नाही, असे पुरी यांना सांगितले आहे. दरम्यान, कोकणवासीयांना हा प्रकल्प नको असेल तर केंद्र सरकारला सुध्दा तो लादण्यात स्वारस्य नाही, असा शब्द हरदीपसिंग पुरी यांनी दिला असल्याची माहिती विनायक राउत यांनी दिली. बारसू रिफायनरीला कडाडून विरोध होत आहे. अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र, स्थानिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून राज्य सरकार भूमाफियांसाठी हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोध करणा—यांना बाहेरून फंडित होत असल्याचे सांगून आम्हाला बदनाम केले जात आहे, असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिका—यांनी केला.
Join Our WhatsApp Community