बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी पगारवाढीच्या मुख्य मागणीसह गेले अनेक दिवस मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. बेस्टच्या या कामबंद आंदोलनाचा सामान्य मुंबईकरांना फटका बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून काही मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन मिळाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. परंतु, या आंदोलनात कामगारांची दिशाभूल झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी केला आहे.
संपकरी कामगारांसोबत चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले की, या कामगारांची विविध संघटनांकडून दिशाभूल केली गेली आहे. मंगळवारी संध्याकाळी अचानक उपोषण, आंदोलन मागे घेतले गेले. या संपाची ज्यांनी सुरुवात केली, त्या खजुरकर कुटुंबाने शिवसेनेशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र राज्य कामगार सेना युनियनच्या लेटरहेडवर आझाद मैदान पोलीस ठाण्याला लिखित अर्ज देत संपाची सांगता केली. त्यामुळे जर का संघटनेचा संप नव्हता, तर हे लेटरहेड कुठून आले? असा संभ्रम कामगारांमध्ये आहे. त्यामुळे संघटनेशिवाय सुरू झालेला संप संघटनेमुळे कसा संपला, असा प्रश्न केतन नाईक यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा लोकसभेतील भाषणानंतर राहुल गांधी आले चर्चेत; का सुरु झाला #Pappu ट्रेंड?)
मागण्या मान्य, पण कागदोपत्री उल्लेख नाही
बेस्ट कंत्राटी कामगारांनी अनेक मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन मिळाल्यामुळे संप मागे घेण्यात आला. यात कामगारांच्या मूळ वेतनात १८ हजार रुपयांची वाढ होणार, कामगारांना मोफत बेस्ट प्रवास मिळणार, सर्व प्रकारच्या सुट्ट्या लागू होणार, प्रतिवर्षी १५ टक्क्यांची वाढ मिळणार, बेस्टच्या रिटायर्ड अधिकाऱ्यांकडून त्रास बंद होणार, गाड्यांची डागडुजी होणार असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, याबद्दल बेस्ट उपक्रम, महानगरपालिका, महाराष्ट्र शासन किंवा ठेकेदाराने कुणीही लेखी आश्वासन दिले नाही. त्यामुळे कामगारांची दिशाभूल झाल्याचा आरोप केतन नाईक यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community