Amit Shah : राजीव गांधी म्हणायचे, रुपयातील ८५ पैसे गायब होतात; अमित शहांनी सांगितला चोर कोण

124

एकदा या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं होतं की, मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यातील केवळ १५ पैसेच पोहोचतात. तेव्हा नवे नवे राजकारणात आले होते, प्रामाणिक व्यक्ती होते, बोलून गेले. पण मी आता पुढे विचारतो की, ते ८५ पैसे पळवायचा कोण. ८५ पैसे तेच लोक घेऊन जायचे ज्यांना या पैशांमध्ये कटकी आणि बटकी करायची होती, असा टोला अमित शाह यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या संसदेत चर्चा सुरू आहे. त्यावेळी अमित शाह बोलत होते.

आता जनधन योजनेला विरोध करणारे तेच लोक आहेत, ज्यांना त्या ८५ पैशांमध्ये मौजमजा करायची होती. मात्र आता भारत सरकार रुपया देते, तेव्हा तो रुपया थेट गरिबाच्या खात्यात जातो. आता हे म्हणतील, डीबीटी कुणी सुरू केली, जीएसटी कुणी सुरू केली, गरिबी हटाव कुणी म्हटलं? तुम्ही म्हटलं सगळं हो, पण केलं आम्ही. कुठलाही कट न लावता २५ लाख कोटी रुपये आम्ही गरिबांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले, असेही अमित शाह यांनी यांनी सांगितले. यावेळी अमित शाह यांनी कर्जमाफीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, विरोधक नेहमी सांगतात की, ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. मात्र आमचा कर्जमाफी करण्यावर विश्वास नाही. तर एक अशी व्यवस्था निर्माण करण्यावर आमचा विश्वास आहे, जिथे कुणाला कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. आम्ही शेतकऱ्यांना जे दिलं आहे, ती खैरात नाही, तर आम्ही त्यांना आत्मनिर्भर बनवले आहे, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.

(हेही वाचा Rahul Gandhi : संसदेत राहुल गांधींचं असभ्य वर्तन; सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.