अनिल अंबानींनी लावलेला चुना राज्य सरकार पुसणार

150
अनिल अंबानींनी लावलेला चुना राज्य सरकार पुसणार

राज्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या नावाखाली उद्योगपती अनिल अंबानी यांनी लावलेला चुना आता महाराष्ट्र सरकार पुसणार आहे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विमानतळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात अपयश आल्यामुळे राज्यातील पाच विमानतळांचे नियंत्रण आता राज्य सरकारच्या अखत्यारितील महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीला दिले जाणार आहे.

बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि धाराशीव या पाच विमानतळांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ऑगस्ट २००९ मध्ये ही पाच विमानतळे ९५ वर्षांच्या करारावर रिलायनसला देखभाल, दुरुस्ती आणि चालविण्यास दिली होती. नांदेड विमानतळाची धावपट्टी २३०० मीटर, लातूर १७००, बारामती ११७२, यवतमाळ ११९०, तर धाराशीव विमानतळाची धावपट्टी १२१८ मीटर लांबीची आहे. मात्र, ही विमानतळे सुरू करण्यास रिलायन्सला अपयश आले आहे. नांदेडमध्ये विमाने उतरतात. पण नाईट लँडिंगचा परवाना डिजीसीएने रद्द केला आहे.

(हेही वाचा – Reserve Bank : व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय)

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नांदेड येथे शासकीय दौरा असताना ही अडचण त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता, याबाबत वारंवार सांगूनही रिलायन्सने शुल्क भरले नाही. तसेच विमानतळांची दुरुस्ती आणि देखभालीकडे या कंपनीचे दुर्लक्ष असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. धाराशीव, यवतमाळ आणि लातूर विमानतळांची कामे १४ वर्षांपासून रखडली आहेत.

राज्यात किती विमानतळे?

– राज्यात सध्या २८ विमानतळे आणि धावपट्टया अस्तित्वात आहेत. त्याव्यतिरिक्त ४ नवीन विमानतळे (नवी मुंबई, पुणे (पुरंदर), सोलापूर (बोरामणी), चंद्रपूर (मूर्ति-विहिरगांव) येथे उभारणे प्रस्तावित आहे.

– या २८ विमानतळांपैकी सद्य:स्थितीत ११ विमानतळे प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे (मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद) असून, ७ विमानतळे (नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, शिर्डी, गोंदिया, जळगांव व जुहू) आंतरदेशीय प्रवासाकरिता परवाना प्राप्त आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.