La Liga 2023 : जगातील प्रसिद्ध लालिगा फुटबॉल लीग प्रक्षेपणासाठी वायकॉम सज्ज

La Liga 2023 : स्पेनमधील जगप्रसिद्ध फुटबॉल लीग ला लिगाच्या भारतातील थेट प्रसारणासाठी वायकॉम १८ कंपनी सज्ज झाली आहे. स्पर्धेचा भारतीय ब्रँड अँबेसिडर रोहीत शर्माच्या उपस्थितीत मुंबईत स्पर्धा प्रसारणाचं वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आलं

213

ला लिगा या स्पेनमधील आघाडीच्या फुटबॉल लीगचा नवीन हंगाम ११ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदा या लीगमधील सर्व सामने वायकॉम १८ च्या स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमा या वाहिन्यांवर पाहता येणार आहेत. भारतातले प्रसारणाचे वेळापत्रक आणि फुटबॉलविषयक इतर कार्यक्रमांची घोषणा भारतीय ब्रँड अँबेसिडर आणि क्रिकेटपटू रोहीत शर्माच्या उपस्थिती आज मुंबईत करण्यात आली.

यंदाच्या हंगामाचे मुख्य खेळाडू असतील ज्यूड बेलिंघॅम (रियाल मद्रिद), आर्डा ग्युलर (रियाल मद्रिद), सिझर एझपिलिक्युटा (ॲटलेटिको मद्रिद) आणि जोनाथन बांबा (सेल्टा). याशिवाय आधीपासून या लीगचे चॅम्पिअन खेळाडू असलेले रॉबर्ट लेवानडोवोस्की, विनी आणि अँटोनिओ ग्रिझमान हेही नवीन हंगामासाठी सिद्ध झाले आहेत.

नवीन हंगामात फुटबॉल सामन्यांच्या प्रसारणासाठी नवीन तंत्रजान आणि नवे कॅमेरा अँगल वापरण्यात येणार आहेत. त्याविषयी बोलताना स्पर्धेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक जोस कॅझा यांनी सांगितलं की, ‘प्रेक्षकांचा सामन्यातील सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि त्यांच्यासाठी सामन्याचा अनुभव जास्तीत जास्त चांगला कसा असेल यादृष्टीने प्रसारण मूल्य वाढवण्याचा आमचा आणि वायकॉम १८चा प्रयत्न असेल.’

(हेही वाचा PM Narendra Modi : फिल्डिंग विरोधकांनी लावली; आम्ही चौकार-षटकार मारले – पंतप्रधान मोदी)

स्पर्धेचा भारतातील ब्रँड अँबेसिडर रोहीत शर्माने क्रिकेट आणि फुटबॉलमधील साम्यस्थळं सांगितली. आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर क्रिकेट भारतात मोठं झालं तसा पाठिंबा फुटबॉललाही मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

ला लिगा ही युरोपमधील सगळ्यात मोठी फुटबॉल लीग आहे. स्पेनमधील ही लीग यावर्षी ९४ वर्षांची होत आहे. आतापर्यंत या लीगमध्ये ६२ संघांनी सहभाग नोंदवला आहे. रियाल मद्रिद, ॲटलेटिको मद्रिद, बार्सिलोना, व्हलेंसिया हे या लीगमधील गाजलेले संघ आहेत. रियाल मद्रिद संघाने लीगमध्ये सर्वाधिक ३५ वेळा विजेतेपद पटकावलं आहे. तर बार्सिलोना या लीगचे सध्याचे विजेते आहेत. बार्सिलोना संघानेही तब्बल २७ वेळा लीग विजेतेपद पटकावलं आहे. एका हंगामात लीगमध्ये २० संघ खेळतात.

लीगमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम लियोनेल मेस्सीच्या नावावर आहे. त्याने बार्सिलोना संघासाठी ४७४ गोल केले आहेत. यंदा ११ ऑगस्टपासून लीग सुरू होत आहे. तर अंतिम सामना २६ मे २०२४ ला होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.